ओमिक्रॉनचा फैलाव वेगाने, पण धोका कमी! मग ओमिक्रॉनची बोंब कुणी ठोकली?

| Updated on: Dec 07, 2021 | 9:22 PM

ओमिक्रॉन व्हेरियंट हा डेल्टा व्हेरियंटपेक्षा कमी घातक असल्याचं एक मत आता समोर येत आहे. त्यामुळे याचा धोका कमी असेल तर मग ओमिक्रॉनची बोंब कुणी ठोकली? हा प्रश्न सध्या जगभरात चर्चिला जातोय. कारण, अमेरिका आता दक्षिण आफ्रिकेवर घातलेली विमानबंदी हटवण्याचा विचार करत आहे. तसंच अनेक देशांमध्ये ख्रिसमसच्या तयारीला वेग आल्याचंही पाहायला मिळत आहे.

ओमिक्रॉनचा फैलाव वेगाने, पण धोका कमी! मग ओमिक्रॉनची बोंब कुणी ठोकली?
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

मुंबई : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा नवा प्रकार (Corona New Variant) असलेल्या ओमिक्रॉनचे (Omicron) रुग्ण भारतात आणि खास करु महाराष्ट्रातही (Maharashtra) आढळून आले आहेत. मात्र, ओमिक्रॉन व्हेरियंट हा डेल्टा व्हेरियंटपेक्षा कमी घातक असल्याचं एक मत आता समोर येत आहे. त्यामुळे याचा धोका कमी असेल तर मग ओमिक्रॉनची बोंब कुणी ठोकली? हा प्रश्न सध्या जगभरात चर्चिला जातोय. कारण, अमेरिका आता दक्षिण आफ्रिकेवर घातलेली विमानबंदी हटवण्याचा विचार करत आहे. तसंच अनेक देशांमध्ये ख्रिसमसच्या तयारीला वेग आल्याचंही पाहायला मिळत आहे. खुद्द दक्षिण आफ्रिकेतल्या तज्ज्ञांनीही ओमिक्रॉनबाबत ब्रिटन नाहक भीती पसरवत असल्याचा आरोप केला होता.

ओमिक्रॉननंतर दक्षिण आफ्रिकेतही रुग्णवाढ जरुर झाली, मात्र त्यातले 70 टक्के रुग्ण हे मुळात इतर आजारांसाठी दवाखान्यात गेले. नव्या नियमांनुसार साध्या मोतीबिंदूचं जरी ऑपरेशन असलं, तरी आता दवाखान्यांमध्ये ऑपरेशनआधी कोरोना चाचणी करावीच लागते. त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेत कोरोना चाचण्या झाल्या आणि इतर व्याधींसाठी आलेले 70 टक्के लोक कोरोनाबाधित निघाले. विशेष म्हणजे यातल्या एकाही व्यक्तीला ऑक्सिजनची गरज भासलेली नाही.

मेरिका सरकार दक्षिण आफ्रिकेवरची विमानबंदी हटवण्याच्या विचारात

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी यांनी सुद्धा असंच मत व्यक्त केल आहे की, दुसरी लाट आणणाऱ्या डेल्टा व्हेरियंटपेक्षा ओमिक्रॉन कमी धोकादायक आहे. सुरुवातीचे वैज्ञानिक अभ्यास हेच सांगतायत. दक्षिण आफ्रिकेत ज्यांना ओमिक्रॉन होतोय, त्यापैकी खूप कमी लोकांना दवाखान्यात भर्ती करावं लागतंय. त्यामुळे अमेरिका सरकार दक्षिण आफ्रिकेवरची विमानबंदी हटवण्याच्या विचारात आहे.

भारतात ओमिक्रॉनची धास्ती, मात्र रोजची रुग्णवाढ कमी

सध्या जगातल्या 47 देशांमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंट पसरलाय आणि भारतात जवळपास या सर्वच देशांमधून विमानसेवा सुरु आहे. रोज हजारो प्रवासी परदेशातून भारतात येतायत, आणि विमानतळावर त्यांची चाचणी सुद्धा होत आहे. आता भारतात ओमिक्रॉनची धास्ती असली, तरी रोजची रुग्णवाढ मात्र सातत्यानं कमी आहे. सात महिन्यानंतर भारतात एका दिवसभरात काल सर्वाधिक कमी रुग्ण निघाले. मे महिन्यात एका दिवसात 4 लाख रुग्ण निघाले होते. तर 6 डिसेंबरला 6 हजार 822 रुग्ण सापडले आहेत.

संक्रमणाचा वेग आणि लोकांचं असहकार्य ही डोकेदुखी

आतापर्यंत ओमिक्रॉन घातक ठरलेला नाहीय. फक्त त्याच्या संक्रमणाचा वेग आणि लोकांचं असहकार्य डोकेदुखी बनलीय. मुंबईत काही दिवसांपूर्वी परतलेल्या 295 पैकी 100 लोक बेपत्ता आहेत. कल्याणमध्ये परदेशातून 318 लोक परतली. मात्र त्यापैकी 12 लोक बेपत्ता आहेत, काहींची घरं बंद आहेत, तर काहींनी फोन बंद ठेवले आहेत. धुळ्यात परदेशातून 28 लोक आले आहेत, त्यांच्या व्हिसावरचा पत्ता धुळ्याचा असला, तरी त्यातले काही जण मुंबई आणि पुण्याला वास्तव्याला आहेत.

ओमिक्रॉनबाबतची चिंता लहान आणि अल्पवयीन मुलांसाठी जास्त

ओमिक्रॉनबाबतची चिंता फक्त लहान आणि अल्पवयीन मुलांसाठी जास्त आहे. कारण, आफ्रिकेत 5 ते 18 वयोगटातल्या बहुतांश मुलांना कोरोना होतोय. भारतानं अद्याप 18 वर्षांखालील मुलांबाबत लसीचा निर्णय झालेला नाही. मात्र फ्रान्स, इटली, स्पेन, जर्मनी, पोलंड, डेन्मार्कसारख्या देशांमध्ये 5 ते 18 वर्षातल्या मुलांचं लसीकरण सुरु झालं आहे.

इतर बातम्या :

स्मार्ट सिटीतील गैरव्यवहारांची केंद्र सरकारकडून चौकशी होणार, केंद्रीय नगरविकास मंत्र्यांचे आदेश

शिवसेना यूपीएत असणार का? पुढील 24 तासांत सांगणार, संजय राऊतांचं सूचक वक्तव्य