
1998 साली प्रदर्शित झालेला 'दुश्मन' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजला नाही. मात्र प्रेक्षकांच्या मनावर खोल ठसा उमटवून गेला. विशेषतः काजोलच्या दमदार आणि तीव्र अभिनयामुळे हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. थिएटरमध्ये घुमणाऱ्या तिच्या किंकाळ्या आणि डोळ्यांतील सूडाची ज्वाला प्रेक्षकांना अक्षरशः हादरवून सोडत होती.

या चित्रपटात काजोलसोबत संजय दत्त आणि खलनायकाच्या भूमिकेत आशुतोष राणा झळकले होते. दिग्दर्शनाची धुरा तनुजा चंद्रा यांनी सांभाळली होती. त्या काळात बॉलिवूडमध्ये थ्रिलर प्रकार हळूहळू लोकप्रिय होत होता. मात्र प्रेक्षकांचा कल रोमँटिक आणि अॅक्शन चित्रपटांकडे अधिक होता. त्यामुळे दमदार कथा आणि अभिनय असूनही ‘दुश्मन’ला अपेक्षित व्यावसायिक यश मिळू शकले नाही.

काजोलने या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारली होती. एक निरागस बहिण आणि दुसरी सूडाने पेटलेली. तिच्या अभिनयातील तीव्रता, विशेषतः वेदना आणि राग व्यक्त करणारे प्रसंग हे चित्रपटाचे मुख्य आकर्षण ठरले. थिएटरमध्ये बसलेले प्रेक्षक अक्षरशः घाबरून जात होते.

चित्रपटाचा अंदाजे बजेट सुमारे 4 कोटी रुपये होते. भारतात त्याने 5.62 कोटी रुपयांची कमाई केली तर जगभरात या चित्रपटाने 10. 16 कोटी रुपयांची कमाई केली. मात्र खर्च आणि वितरणाच्या गणितामुळे तो व्यावसायिकदृष्ट्या अपयशी ठरला.

या चित्रपटात संजय दत्तने सैन्यातील अधिकाऱ्याची भूमिका साकारली, जो नायिकेला मदत करतो. मात्र त्याचा स्टारडम चित्रपटाला हिट ठरवू शकला नाही. प्रदर्शनावेळी चित्रपटाला समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या. मात्र त्याच काळात कुछ कुछ होता है आणि घातक यांसारखे चित्रपट लोकप्रिय होत होते, त्यामुळे ‘दुश्मन’ ला यश मिळाले नाही.