याला म्हणतात कॉमेडी चित्रपट, 2 वर्षांपासून YouTube वर ट्रेंड करतोय चित्रपट, फ्रीमध्ये पाहू शकता
गेल्या 2 वर्षांपासून यूट्यूबवर धुमाकूळ घालत आहे हा सासू-सुनेवर आधारित चित्रपट. थिएटरमध्ये प्रदर्शित न करता थेट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला होता चित्रपट.

भोजपुरी सिनेमामध्ये कौटुंबिक कथा, सासू-सुनेची नोकझोंक आणि हलक्याफुलक्या विनोदी चित्रपटांना प्रेक्षकांकडून नेहमीच मोठी पसंती मिळत असते. ग्रामीण भागातील प्रेक्षकांपासून ते छोट्या शहरांतील कुटुंबांपर्यंत अशा चित्रपटांची खास क्रेझ पाहायला मिळते.

अशातच 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या एका भोजपुरी कॉमेडी-ड्रामा चित्रपटाने थिएटरमध्ये रिलीज न होता देखील प्रचंड लोकप्रियता मिळवली. या चित्रपटाचं नाव आहे सास नंबरी बहू दस नंबरी. या चित्रपटाने गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले असून आजही यूट्यूबवर या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट थेट सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात आला नव्हता.

8 जून 2024 रोजी याचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर करण्यात आला आणि त्यानंतर तो डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला. घरबसल्या पाहता येणारा हा कौटुंबिक चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आणि सोशल मीडियावरही त्याची जोरदार चर्चा रंगली.

‘सास नंबरी बहू दस नंबरी’ची कथा एका पारंपरिक कुटुंबाभोवती फिरते. घरातील सासूला संपूर्ण कुटुंबावर आपलं वर्चस्व टिकवून ठेवायचं असतं. आपल्या मुलासाठी भरपूर हुंडा घेऊन येणारी सून मिळावी, अशी तिची अपेक्षा असते. मात्र, तसं होत नाही आणि त्यामुळे ती आपल्या सुनेला सतत टोमणे मारत राहते.

यूट्यूबवर रिलीज होताच चित्रपटाला लाखो व्ह्यूज मिळू लागले. अवघ्या 24 तासांत या चित्रपटाने 15 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळवल्याचं सांगितलं जातं. तर आतापर्यंत या चित्रपटाला 12 मिलियनपेक्षा जास्त वेळा पाहिलं गेलं आहे. सोशल मीडियावरही या चित्रपटाची जोरदार चर्चा झाली होती.