राम..राम नाव जपतच बघावा लागेल हा हॉरर चित्रपट, सीन आणि कथा पाहून अनेकजण घाबरतात
राम..राम नाव जपतच तुम्हाला हा हॉरर चित्रपट बघावा लागेल. किती जरी हॉरर चित्रपटाचा चाहता असेल तो देखील हा चित्रपट पाहून घाबरेल. ओटीटीवर आहे उपलब्ध.

हॉरर आणि सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटांची लोकप्रियता दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असून, अशाच चर्चेत असलेल्या इंडोनेशियन भयपट 'ए वुमन कॉल्ड मदर' ने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर 19 सप्टेंबर 2025 रोजी फँटॅस्टिक फेस्टमध्ये झाला होता.

त्यानंतर थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला त्याच्या वेगळ्या कथानकामुळे आणि भयावह वातावरणामुळे चांगलीच चर्चा मिळाली. रँडॉल्फ झैनी दिग्दर्शित या चित्रपटाची कथा एका विभक्त महिलेची आहे, जी आपल्या दोन मुलांसह नव्या घरात राहायला येते.

सुरुवातीला सर्व काही सुरळीत असते, मात्र काही दिवसांतच मुलांना आईच्या वागण्यात विचित्र आणि भयावह बदल जाणवू लागतात. त्यानंतर आईसोबत नेमके काय घडत आहे, याचा शोध घेण्याचा त्यांचा थरारक प्रवास सुरू होतो.

चित्रपटातील अनेक सीन अंगावर काटा आणणारी असून, क्लायमॅक्सही अत्यंत गडद आणि धक्कादायक आहे. प्रेक्षक आणि समीक्षकांकडून या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी अनेकांनी त्याचे कथानक, वातावरणनिर्मिती आणि आर्टिका सारी देवी यांच्या अभिनयाचे कौतुक केले.

या चित्रपटाला 2025 च्या इंडोनेशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेस' आणि 'बेस्ट व्हिज्युअल इफेक्ट्स'सह विविध विभागांत नामांकन मिळाले. IMDb वर या चित्रपटाला 10 पैकी 6.0 रेटिंग मिळाले आहे.