अहंकारामुळे अजय देवगण-करिश्मा कपूरचा हा चित्रपट कधीच प्रदर्शित झाला नाही, निर्मात्यांचं झालं मोठं नुकसान
अहंकारामुळे करिश्मा कपूर आणि अजय देवगण यांचा मोठ्या बजेटचा हा चित्रपट कधीच प्रदर्शित होऊ शकला नाही. दोघांमुळे निर्मात्यांचे झाले मोठे नुकसान. कोण आहे तो चित्रपट?

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा कपूर आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. तिने तिच्या कारकिर्दीत अनेक हिट, सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. 90 च्या दशकात करिश्मा कपूरचे नाव बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक म्हणून घेतले जात होते.

मात्र, तिच्या कारकिर्दीत एक असा चित्रपट आला जो मोठ्या अपेक्षांनंतरही कधीच प्रदर्शित होऊ शकला नाही. या चित्रपटात तिच्यासोबत अजय देवगण मुख्य भूमिकेत झळकणार होता. पण वैयक्तिक आयुष्यातील मतभेदांमुळे हा चित्रपट कायमचा बंद पडला.

1990 च्या दशकात करिश्मा कपूर आणि अजय देवगण ही जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी मानली जात होती. ‘जिगर’, 'सुहाग' आणि 'शक्तिमान' यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.

एकत्र काम करताना दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांच्या प्रेमसंबंधांच्या चर्चाही त्या काळातील मनोरंजन विश्वात रंगू लागल्या. याच काळात दिग्दर्शक प्रकाश झा यांनी करिश्मा आणि अजय यांना घेऊन ‘काला पानी’ हा मोठ्या बजेटचा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला.

या चित्रपटाकडून निर्माते आणि प्रेक्षक दोघांनाही मोठ्या अपेक्षा होत्या. ‘काला पानी’चे चित्रीकरण सुरू झाल्यानंतर काही काळातच करिश्मा आणि अजय यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा समोर येऊ लागल्या. त्याच काळात अजय देवगणच्या आयुष्यात अभिनेत्री काजलची एंट्री झाल्याचे म्हटले जाते. त्यानंतर करिश्मा आणि अजय यांचे नाते तणावपूर्ण बनले. या वैयक्तिक वादाचा थेट परिणाम चित्रपटाच्या शूटिंगवर झाला. त्यामुळे अखेरीस निर्मात्यांसमोर चित्रपट बंद करण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही.