91 मिनिटांत फुल थ्रिल अन् जबरदस्त ट्विस्ट, श्वास रोखून धरणारी कथा; सत्य घटनेवर आधारित सिनेमा ओटीटीवर ट्रेंडिंग
OTT Movie: हा चित्रपट 21 ऑगस्ट 2026 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला असून त्याचा रनटाइम 91 मिनिटांचा आहे. ओटीटीवर स्ट्रीम झाल्यानंतर या सिनेमाने वेगाने लोकप्रियता मिळवली असून तो नेटफ्लिक्सच्या लोकप्रिय चित्रपटांच्या यादीत वर पोहोचला आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या क्राइम आणि थ्रिलर सिनेमांची चांगलीच चर्चा आहे. अशातच नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणारा 91 मिनिटांचा मेक्सिकन क्राइम-अॅक्शन थ्रिलर प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची कथा काल्पनिक नसून कुख्यात ड्रग लॉर्ड जोआकिन 'एल चापो' गुझमन याच्या 2016 मधील पुनर्अटकेच्या सत्य घटनेपासून प्रेरित आहे.

चित्रपटाच्या कथेच्या केंद्रस्थानी आहेत दोन मेक्सिकन फेडरल पोलीस अधिकारी- आर्टुरो कार्मोना आणि हेक्टर रोसाले. त्यांच्या नेहमीच्या ड्युटीच्या शेवटच्या काही तासांमध्ये एक साधी ट्रॅफिक तपासणी त्यांच्या आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकते.

हे दोन्ही अधिकारी एका संशयास्पद आणि चोरीच्या नंबर प्लेट असलेल्या गाडीला थांबवतात. मात्र गाडीमध्ये कोण आहे, याची त्यांना सुरुवातीला कल्पनाच नसते. तपास करताना त्यांच्या लक्षात येतं की समोर बसलेला व्यक्ती म्हणजे मेक्सिकोतील सर्वांत कुख्यात ड्रग माफियांपैकी एक एल चापो (El Chapo) आहे.

यानंतर सुरू होतो जीवघेणा संघर्ष. एका बाजूला कायद्याचं पालन करण्याची जबाबदारी, तर दुसऱ्या बाजूला अत्यंत शक्तिशाली कार्टेलची भीती- या कात्रीत हे दोन पोलीस अधिकारी अडकतात. 'फेसिंग एल चापो' या चित्रपटाची कथा ऑपरेशन ब्लॅक स्वॅन या मोहिमेशी संबंधित आहे.

8 जानेवारी 2016 रोजी मेक्सिकोच्या सिनाओला प्रांतातील लॉस मोचीस इथं एल चापोला पुन्हा अटक करण्यात आली होती. त्याआधी तो 2015 मध्ये मेक्सिकोच्या तुरुंगातून एका बोगद्याद्वारे पळून गेला होता. सिनेमाच्या कथेत अटकेनंतरचा हा प्रसंग अत्यंत महत्त्वाचा ठरतो. जर तुम्हाला Narcos, Sicario किंवा सत्य घटनांवर आधारित क्राइम-थ्रिलर पहायला आवडत असतील, तर 'फेसिंग एल चापो' हा सध्या नेटफ्लिक्सवरील चर्चेत असलेला पर्याय ठरू शकतो.