
दरवर्षी महाशिवरात्रीच्या निमित्ताने एक भक्तिमय गाणं पुन्हा सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसत आहे. ते म्हणजे नमो नमो. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या केदारनाथ या चित्रपटातील हे गाणं आजही भक्तांच्या आणि चित्रपटप्रेमींच्या मनात तितकंच जिवंत आहे.

भगवान शिवांवरील गाढ श्रद्धा व्यक्त करणारं हे गाणं ऐकताच अंगावर रोमांच उभे राहतात. या गाण्याचं संगीत दिग्दर्शन आणि गायन प्रसिद्ध संगीतकार अमित त्रिवेदी यांनी केलं आहे तर भावपूर्ण शब्दरचना अमिताभ भट्टाचार्य यांनी केली आहे. बर्फाच्छादित डोंगररांगा, निसर्गरम्य दऱ्या आणि केदारनाथच्या पवित्र परिसरात चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यामुळे त्याला वेगळीच आध्यात्मिक उंची मिळाली आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर ‘नमो नमो’ हे गाणं त्याच्या चाहत्यांसाठी आणखी खास बनलं. यूट्यूबवरील कमेंट्समध्ये आजही चाहते त्याला आठवतात. श्रद्धांजली अर्पण करतात. अनेकांसाठी हे गाणं केवळ भक्तिगीत नसून सुशांतच्या साधेपणाची, निरागस हास्याची आणि त्याच्या अभिनयाची भावनिक आठवण बनलं आहे.

केदारनाथ या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक कपूर यांनी केलं होतं. हा चित्रपट रोमँटिक कथा आणि 2013 मधील उत्तराखंड पुराच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने जागतिक स्तरावर सुमारे 102.77 कोटी रुपयांची कमाई केली होती.

मात्र, केवळ कमाईसाठी नाही तर त्यातील भावनिक कथा आणि ‘नमो नमो’सारख्या भक्तिगीतामुळे हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. महाशिवरात्री आली की ‘नमो नमो’ पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये येतं.