
98 व्या अखिल भारतीय संमेलनाला आजपासून राजधानी दिल्लीत सुरूवात होत आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर पार पडणारं हे पहिलं साहित्य संमेलन दिल्लीत होत आहे.

लोकसाहित्याच्य ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर या संमेलनाच्या अध्यक्षपदी असून शरद पवार हे स्वागताध्यक्ष आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे.

21,22 आणि 23 फेब्रुवारीला हे साहित्य संमेलन पार पडणार आहे. देशाच्या राजधानीत तब्बल 7 दशकांनी, 71 वर्षानंतर साहित्य संमेलन होत आहे. दिल्लीतील तालकटोरा स्टेडिअममधील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत हे साहित्य संमेलन होईल.

साहित्य संमेलनाला सुरूवात होण्यापूर्वी ढोल ताशांच्या गजरात ग्रंथदिंडीची सुरूवात झाली. महाराष्ट्राची लोककला, महाराष्ट्राची संस्कृती याचं सादरीकरण या ग्रंथदिंडीद्वारे करण्यात आलं

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त जुन्या संसद भवनापासून ग्रंथ दिंडी काढण्यात आली. महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा कादंबरीची प्रतिकृतीही या ग्रंथदिंडीत ठेवण्यात आली होती.

भगवे फेटे घालून, पारंपारिक वेशभूषा करून, लेझिम नृत्य करत मोठ्या उत्साहात ग्रंथदिंडी निघाली. महाराष्ट्रातील संस्कृतीचं या दिंडीत दर्शन झालं. वासुदेव असो किंवा राज्यातील कानाकोपऱ्यातील नागरिकांच्या वेशभूषा करून अनेक जण या दिंडीत सहभागी झाले होते.