
'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रुपाली भोसलेच्या गाडीचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये रुपालीला कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र, रुपालीच्या गाडीचे नुकसान झाले आहे.

अभिनेत्री रुपली भोसलेने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर गाडीच्या अपघाताचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिच्या मर्सिडीज बेन्झ गाडीचे नुकसान झाल्याचे दिसत आहे.

काही दिवसांपूर्वीच रुपाली भोसलेने नवी मर्सिडिज बेन्झ गाडी खरेदी केली होती. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली होती. आता याच गाडीचा अपघात झाल्याचे रुपालीने सांगितले आहे.

रुपालीने गाडीचे फोटो शेअर करत त्यावर 'अपघात झाला.. अतिशय वाईट दिवस' असे कॅप्शन दिले. तसेच त्यासोबत हृदय तुटलेला इमोजी वापरला आहे. अपघातात रुपालीच्या नव्या कोऱ्या लग्झरी कारचे नुकसान झाल्याचे दिसत आहे.

रुपालीच्या मर्सिडिज बेन्झ कारच्या बोनेटला डेन्ट आला आहे. तर, समोरुनही बोनेट डॅमेज झाले आहे. रुपालीचा हा अपघात कसा झाला याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.