
जवेरिया अब्बासी ही पाकिस्तानी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. जवेरिया तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. 2024 मध्ये तिने वयाच्या 51 व्या वर्षी दुसरं लग्न केलं होतं. या लग्नसोहळ्यात तिची मुलगी, जावई आणि मुलीचे सासरचे मंडळीही उपस्थित होते.

जवेरियाचं पहिलं लग्न 1997 मध्ये तिचा चुलत भाऊ शमून अब्बासी याच्याशी झालं होतं. परंतु लग्नाच्या 12 वर्षांनंतर त्यांनी 2009 मध्ये घटस्फोट घेतला. या दोघांना एक मुलगी असून अंजेला अब्बासी तिचं नाव आहे. आईप्रमाणेच तीसुद्धा अभिनयक्षेत्रात काम करते.

घटस्फोटाच्या जवळपास 15 वर्षांनंतर जवेरियाने वयाच्या 51 व्या वर्षी एक्स्पोर्ट बिझनेसमन अदील हैदरशी लग्न केलंय. या दुसऱ्या लग्नामुळे ती चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत तिने चाहत्यांना या लग्नाची माहिती दिली. यावरून काहींनी तिला ट्रोलसुद्धा केलंय.

एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत जवेरियाचा पती अदिलने ट्रोलिंगवर मौन सोडलं होतं. "लोकांनी आमच्याबद्दल खूप वाईट कमेंट्स केले. आम्हा दोघांच्या वयात काहीच अंतर नाही. आम्ही एकाच वयाचे आहोत. आमच्या आवडीनिवडीसुद्धा एकसमान आहेत. मीसुद्धा मुस्लीम आहे", असं त्याने स्पष्ट केलं होतं.

तर जवेरियानेही तिच्या दुसऱ्या लग्नावरून होणाऱ्या ट्रोलिंगवर प्रत्युत्तर दिलं होतं. "माझ्या दुसऱ्या लग्नाला माझ्या मुलीचीही परवानगी होती. तिचे सासरचे मंडळीही या लग्नात सहभागी झाले होते. मी ट्रोलर्सकडे फारसं लक्ष देत नाही", असं ती म्हणाली होती.