
अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघाताने अनेकांच्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणले आहेत. गायिका आणि अभिनेत्री रागेश्वरी लुंबाने नुकतंच याचं एक उदाहरण सांगितलं. अहमदाबादच्या घटनेनंतर एका जोडप्याने घटस्फोट मागे घेतला, असा खुलासा तिने केला.

रागेश्वरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर यासंदर्भातील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात ती म्हणाली, "तुम्हाला माहीत आहे का, त्या हृदयद्रावक विमान अपघातानंतर लोकांनी त्यांच्या कुटुंबीयांना फोन करण्यास सुरुवात केली."

"मला एक जोडपं असंही माहीत आहे ज्यांनी त्यांचा घटस्फोट मागे घेतला. अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर त्यांनी त्यांचा अहंकार बाजूला ठेवला, घमंड बाजूला ठेवला आणि त्यांचे वाद सोडवले", असं ती पुढे सांगते.

मानसशास्त्रज्ञांच्या मते जेव्हा आपल्यावर एखादं संकट येतं तेव्हाच लोक त्यांच्या आनंदाची खऱ्या अर्थाने किंमत करायला शिकतात. म्हणूनच जीवनात प्रतिकूल परिस्थिती असणंही महत्त्वाचं असतं.

रागेश्वरी पुढे म्हणाली, "आपल्या आयुष्याचा खरा अर्थ समजण्यासाठी त्यातले चढ-उतार पाहणं गरजेचं आहे. यशाचा खरा आनंद चाखण्यासाठी, समजण्यासाठी आपल्याला अपयशांमधून जावंच लागेल. अहमदाबादसारख्या दुर्घटना आपल्याला एक क्षण थांबून विचार करायला भाग पाडतात."

"हे जीवन खरंच नाजूक आहे आणि त्यातील नातेसंबंध मौल्यवान आहेत. तुम्हीसुद्धा आता तुमच्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवत असाल, अशी मला आशा आहे", अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत.

एअर इंडियाच्या विमान अपघातात 250 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. उड्डाणानंतर काही सेकंदातच हे विमान एका मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळलं होतं.

रागेश्वरीबद्दल बोलायचं झाल्यास, तिने 'मैं खिलाडी तू अनाडी', 'आँखे' यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. नव्वदच्या दशकात तिने अनेक हिट पॉप गाणीसुद्धा गायली आहेत.