
मोहित सुरी दिग्दर्शित 'सैयारा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातून अभिनेता अहान पांडे आणि अनित पड्डा यांनी बॉलिवूडमध्ये मुख्य भूमिकेतून पदार्पण केलं आहे. चित्रपटातील दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री तुफान हिट झाली.

'सैयारा'च्या यशानंतर शनिवारी सक्सेस पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीतील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये अहान आणि अनीत यांच्यातील जवळीक स्पष्ट पहायला मिळत आहे.

अहान आणि अनीत यांच्यातील वाढती जवळीक पाहून हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले की काय, असा प्रश्न नेटकऱ्यांना निर्माण झाला आहे. या दोघांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं आहे. अहान पांडेच्या आईनेच या पार्टीतील काही खास फोटो शेअर केले आहेत.

याआधी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये अहान आणि अनीत एकत्र शॉपिंग करतानाही दिसले. दुकानातून बाहेर पडल्यानंतर अहानने अनीतचा हात पकडण्यासाठी त्याचा हात पुढे केला होता. परंतु पापाराझींना पाहून अनीतने अहानचा हात पडकला नाही. हे कळताच त्याने आपला हात मागे घेतला. हा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अहान पांडे हा अभिनेत्री अनन्या पांडेचा चुलत भाऊ आहे. 'सैयारा' या चित्रपटातून अहानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. तर मुख्य अभिनेत्री म्हणून अनीत पड्डाचा हा पहिलाच चित्रपट आहे. याआधी तिने छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत.