ऐश्वर्या नारकर लवकरच होणार सासूबाई? मुलाच्या गर्लफ्रेंडनं प्रेमाची कबुली देत सांगितली लव्हस्टोरी
ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांचा मुलगा अमेय नारकर मराठी अभिनेत्रीला डेट करतोय. 'लाखात एक आमचा दादा' फेम ईशा संजयने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे.

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांचा मुलगा अमेय नारकर सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अमेय एका मराठी अभिनेत्रीला डेट करत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. अखेर या अभिनेत्रीनेच आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिल्याने या नात्याची चर्चा रंगली आहे.
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून 'लाखात एक आमचा दादा' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली ईशा संजय आहे. ऐश्वर्या आणि अविनाश नारकर ही मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय जोडी आहे. दोघांनीही आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यांचा मुलगा अमेय मात्र प्रसिद्धीपासून काहीसा दूर असतो.
अमेय सध्या परदेशात उच्च शिक्षण घेत असून त्याला अभिनय आणि नाट्यविश्वाचीही आवड आहे. तो रंगभूमीवर सक्रिय राहिला आहे. ईशा संजय ही मराठी मनोरंजनविश्वातील अभिनेत्री आहे. झी मराठीवरील 'लाखात एक आमचा दादा' या मालिकेमुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तिने राजश्री अर्थात राजू ही भूमिका साकारली होती.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ईशा म्हणाली, "माझी आणि अमेयची पहिली भेट कॉलेजमध्ये झाली. आम्हा दोघांनाही कामाची फार आवड आहे आणि माझ्यापेक्षा तो जास्त प्रामाणिक अभिनेता आहे. तो खूप कष्टाळू आहे आणि त्याच्या याच गोष्टीकडे मी सर्वांत आधी आकर्षित झाले. बाकी गुड लूक्स आणि चांगला अभिनेता हे मला पॅकेजच मिळालं आहे."
"प्रेमापेक्षाही आधी आमच्यात खूप चांगली मैत्री झाली. आम्ही कधीच प्रेमाच्या अनुषंगाने बोलायला वगैरे गेलो नाही. एकाच वर्गात असल्याने आणि एकत्र शिकत असल्याने माणूस म्हणून घडताना आम्ही एकत्र होतो. तो दोघांच्याही आयुष्यातला महत्त्वाचा काळ होता. ते सर्व खूपच स्पेशल आहे आणि ते तसंच राहणार आहे", अशा शब्दांत ती व्यक्त झाली.
प्रपोज कोणी केलं, याविषयी बोलताना ईशाने पुढे सांगितलं, "आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र होतो आणि त्यातच एकमेकांना आम्ही आवडायला लागलो. प्रेमासाठी पुढाकार वगैरे असं काहीच नव्हतं. कारण ते गृहित धरल्यासारखंच झालं होतं. त्यामुळे एकमेकांना आम्ही प्रपोज वगैरे कधी केलं नाही."
ईशाने काही महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर 'आस्क मी सेशन' घेतलं होतं. यावेळी एका चाहत्याने तिला, 'तुझं लग्न झालंय का दीदी?' असा प्रश्न विचारला. त्यावर ईशाने अमेयसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला. तसंच, 'लग्न नाही झालंय कारण, कोणीतरी खूप दूर आहे सध्या' असं उत्तर दिलं होतं. तिच्या या उत्तरातून दोघंही लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असल्याचं स्पष्ट झालं होतं.
याच लाँग डिस्टन्स रिलेशनशिपबद्दल ईशा म्हणाली, "असं नातं सोपं आहे असं मी म्हणणार नाही. आपली तयारी असेल तर माणूस कोणत्याही परिस्थितीत मॅनेज करतो. आमच्या दोघांचीही तयारी होती, त्यामुळे आमचं सुरळीत सुरू आहे." अमेय आणि ईशाच्या नात्याची आणखी एक खास गोष्ट म्हणजे ईशाचे ऐश्वर्या नारकर यांच्यासोबतही चांगले संबंध आहेत.