
मराठमोळ्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर त्यांच्या स्टायलिश अंदाजासाठी ओळखल्या जातात. ऐश्वर्या आणि त्यांचे पती अविनाश नारकर हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. इन्स्टाग्रामवर ते सतत रील्स आणि फोटो पोस्ट करत नेटकऱ्यांचं मनोरंजन करतात.

ऐश्वर्या यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकतेच काही फोटो पोस्ट केले असून त्यावरून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्यांना त्यांच्या ड्रेसिंग स्टाइलवरून ट्रोल केलंय.

ऐश्वर्या यांनी बॅकलेस टॉप आणि पँट अशा लूकमध्ये हा फोटोशूट केला आहे. त्यावरूनच काही नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. 'ताई तुम्हाला शोभत नाही, आपली संस्कृती नका विसरू', असं एकाने म्हटलंय. तर 'आपण एक नावाजलेल्या अभिनेत्री आहात, हे तुम्हाला शोभत नाही. या वयात तर नाहीच नाही', असं दुसऱ्याने लिहिलंय.

काही नेटकऱ्यांनी ऐश्वर्या यांच्या या लूकचं कौतुकसुद्धा केलंय आणि ट्रोलर्सना फटकारलंय. 'पन्नासाव्या वर्षी वाढलेलं पोट आणि टक्कल घेऊन फिरणारे लोक किंवा त्या आधीच्या वयाचे पण.. आपल्याला जी गोष्ट जमत नाही, ती एखाद्याने मिळवली तर नावं ठेवत बसतात', अशा शब्दांत नेटकऱ्यांनी ऐश्वर्या यांची बाजू घेतली आहे.

हे तेच लोक आहेत, जे हिंदीतल्या हिरोईनची खूप तारीफ करतात आणि मराठीतल्या कोणी अभिनेत्रीने काही केलं तर त्यांना उलटसुलट बोलतात, अशी टीका नेटकऱ्यांनी ऐश्वर्या यांच्या ट्रोलर्सवर केली आहे. ऐश्वर्या यांचा इन्स्टाग्रामवर खूप मोठा चाहतावर्ग आहे.