
देभरातील अनेक मुले अशी आहेत ज्यांना शिक्षणाची प्रचंड आवड असते. पण ओढावलेल्या परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेणे थोडे अवघड होते. तरीही काही मुले जिद्दीने पुढे जातात, शिक्षण घेतात आणि मोठे नाव कमावतात. अशीच एक घटना अकोला येथे घडली आहे. या जिल्ह्यातील एका भंगार विकणाऱ्या व्यक्तीच्या मुलाने मोठ्या जिद्दीने महाराष्ट्र इंजिनीअरिंग सर्व्हिसेस परीक्षेत मोठे यश मिळवले आहे.

अकोला जिल्ह्यातल्या पातुर तालुक्यातल्या शिर्ला येथील भंगारविक्री करणारे हुसेनशहा यांचा मुलगा रोशनने मोठे यश प्राप्त केले आहे. त्याने जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर महाराष्ट्र इंजिनीअरिंग सर्व्हिसेस परीक्षेत राज्यात 18 वा क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या यशाने गावकऱ्यांची मान अभिमानाने उंचावली आहे. मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली आहे.

रोशनने जिद्दीने ही परिक्षा पास केली आहे. त्याचा राज्यात 18 क्रमांक आल्यानंतर त्याची जलसंधारण अधिकारी पदासाठी निवड होणार असल्याचे म्हटले जात आहे. एका भंगार वेचणाऱ्याच्या मुलाने मेहनतीने इतकी मोठे यश मिळवल्यामुळे संपूर्ण राज्यात कौतुक केले जात आहे. मोठ्या थाटामाटात, डिजे लावत, गुलाल उधळत मिरवणूक काढण्यात आली आहे.

रोशनच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. वडील भंगार गोळा करून तुटपुंज्या उत्पन्नातून घरखर्च भागवत असत. तर रोशनच्या दोन्ही बहिणींना हुशार असूनही हालाकीच्या परिस्तिथीमुळे शिक्षण थांबवावे लागले होते. वडिलांकडे त्यांच्या शिक्षणासाठी पैसे नव्हते. त्यामुळे बहिणींनी देखील परिस्थीतीची जाणीव ठेवत शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला.

रोशनची आईही मोल मजुरी करीत होती. अशा खडतर परिस्थितीत रोशनने शिक्षणाचा ध्यास सोडला नाही. गेल्या वर्षी महाराष्ट्र इंजिनीअरिंग सर्व्हिसेस परीक्षेत रोशनची अवघ्या 15 गुणांनी संधी हुकली होती. मात्र रोशनने हार मानली नाही. 2024च्या परीक्षेत रोशनने राज्यात 18 वा क्रमांक मिळवत आपलं स्वप्नपूर्ण केलं आहे. सध्या संपूर्ण देशात त्याचे कौतुक होत आहे.