
व्हिस्की, व्होडका, रेड वाईन आणि शॅम्पेन... हे चारही प्रकार दारूच्या प्रकारात मोडत असले तरी त्यांचे रंग मात्र वेगवेगळे असतात. व्हिस्कीचा रंग सोनेरी, वाईनचा लाल आणि व्होडक्याचा रंग पाण्यासारखा पांढरा असतो.

या प्रत्येक गोष्टीत अल्कोहोल असले तरी यात रंगाचा फरक नेमका कशामुळे येतो? यामागे काय कारण असते? याचे उत्तर समोर आले आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, दारूचा रंग ती कशी बनवली जाते आणि कुठे साठवली जाते यावर अवलंबून असतो.

प्रत्येक अल्कहोलयुक्त पेय तयार करण्याची आणि ते गाळण्याची म्हणजेच फिल्टर करण्याची प्रक्रिया वेगवेगळी असते. त्यामुळे त्यांचे रंग आणि गुणधर्म बदलतात. तज्ज्ञांच्या मते, अल्कोहोलिक पेयांना विशिष्ट रंग मिळण्यामागे तीन प्रमुख कारणे असतात.

व्हिस्की, रम आणि ब्रँडी ही पेये वर्षांनुवर्षे ओकच्या लाकडी बॅरल्समध्ये साठवली जातात. लाकडातील नैसर्गिक रंग, टॅनिन आणि कॅरामेल हे घटक पेयात विरघळतात. यामुळे व्हिस्कीला सोनेरी किंवा तपकिरी रंग मिळतो. तसेच जर ती जास्त वेळ त्यात राहिली तर त्याचा रंग अधिक गडद होतो.

रेड वाईनचा खास लाल रंग लाल किंवा काळ्या द्राक्षांच्या सालीतून मिळतो. वाईन बनवताना द्राक्षांच्या सालींचाही वापर केला जातो. या सालीतील नैसर्गिक घटक असल्याने त्याला लाल रंग प्राप्त होतो.

व्हिस्की ही जव, मका आणि राई या धान्यांपासून तयार केली जाते. फर्मेंटेशननंतर लाकडी बॅरलमध्ये ठेवल्यावर तिला रंग आणि चव मिळते. तसेच बिअरमध्ये वापरलेल्या जव जितके जास्त भाजले जाते, तितका तिचा रंग गडद होतो.

व्होडका आणि जिन यांसारखी अल्कोहोलयुक्त पेये अनेकवेळा गाळून अत्यंत शुद्ध केली जातात. या प्रक्रियेत रंग देणारे सर्व घटक वेगळे होतात. त्यामुळे ही पेये पाण्यासारखी पारदर्शक दिसतात.

पेयाचा रंग हा त्याच्या निर्मिती प्रक्रियेचा भाग असतो. त्यामुळे कोणत्याही पेयाचा रंग अल्कोहोलच्या प्रमाणावर थेट परिणाम करत नाही.