
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आपल्या 56 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक हिट आणि फ्लॉप चित्रपट दिले. त्यापैकीच 1980 साली प्रदर्शित झालेला 'शान' हा चित्रपट त्या काळातील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक होता.

‘शान’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत सुनील दत्त, शशि कपूर, शत्रुघ्न सिन्हा, राखी गुलजार, परवीन बॉबी, बिंदिया गोस्वामी, जॉनी वॉकर आणि कुलभूषण खरबंदा यांसारखी मोठी स्टारकास्ट होती. हा चित्रपट सुमारे 6 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता.

मोठ्या अपेक्षांसह रिलीज झालेल्या या चित्रपटाची सुरुवात चांगली झाली. मात्र निगेटिव्ह रिव्ह्यूजमुळे त्याच्या कमाईवर परिणाम झाला. परिणामी, ‘शान’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. या चित्रपटाने सुमारे 8 कोटी रुपयांची कमाई केली जी अपेक्षेपेक्षा कमी होती.

जरी ‘शान’ सुरुवातीला अपयशी ठरला तरी कालांतराने त्याला ‘कल्ट क्लासिक’चा दर्जा मिळाला. चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर निर्मात्यांना चांगला नफा झाला. तसेच 80-90 च्या दशकात टीव्हीवर प्रसारित झाल्यानंतर हा चित्रपट प्रेक्षकांचा आवडता बनला.

या चित्रपटातील गाणीही खूप गाजली. 'जानू मेरी जान' या गाण्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. ‘शान’ हा चित्रपट सुरुवातीला अपयशी ठरला असला तरी त्याची कथा, पात्रे आणि संगीत यामुळे तो आजही प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान राखून आहे.