बंगला, फार्महाऊसचा नाद सोडा, भोंदू बाबा अशोक खरातचा राजवाड्याचे फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का
अध्यात्म आणि भोंदूगिरीच्या नावाखाली महिलांची फसवणूक करणाऱ्या अशोक खरातच्या सिन्नरमधील १७ एकरच्या आलिशान 'ब्रह्मासदन' फार्महाऊसचे फोटो व्हायरल झाले असून, आता तुर्कीहून मागवलेले फर्निचर आणि कस्टम ड्युटी प्रकरणी खरात एसआयटीच्या रडारवर आला आहे.

अध्यात्म आणि भोंदूगिरीच्या नावाखाली महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अशोक खरात हा सध्या पोलिसांच्या कोठडीत आहेत. अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्राच्या सामाजिक आणि पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणी एसआयटीकडून तपास सुरु आहे.

आता अशोक खरातचा एक नवा कारनामा समोर आला आहे. अशोक खरातने उभे केलेले साम्राज्य सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. अशोक खरात विरुद्ध पुणे येथील उद्योजक राजेंद्र जासूद यांनी तक्रार दाखल केली आहे.

या तक्रारीनंतर, अशोक खरातचे सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील आलिशान फार्म हाऊस आणि त्याची जगभ्रमंती आता तपास यंत्रणांच्या रडारवर आली आहे. तसेच अशोक खरातच्या राजवाड्याप्रमाणे दिसणाऱ्या अलिशान फॉर्महाऊसचे काही फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अशोक खरातच्या फार्महाऊसचे नाव ब्रह्मासदन असे असून ते नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे वसलेले आहेत. ब्रह्मासदन हे फार्महाऊस त्याच्या भव्यतेमुळे आणि निसर्गरम्य परिसरामुळे चर्चेचा विषय ठरत आहे.

साधारण १७ एकरच्या विस्तीर्ण परिसरात हे फार्महाऊस असून ते दोन मजली आहे. या फार्महाऊसची रचना अत्यंत देखणी आहे. या वास्तूची अंतर्गत सजावटही फारच सुंदर करण्यात आली आहे.

या फार्महाऊससाठी लागणारे विशेष फर्निचर थेट तुर्की (Turkey) येथून मागवण्यात आले आहे. या फार्महाऊसमध्ये सुमारे १५ ते १६ प्रशस्त खोल्या असून प्रत्येक कोपरा महागड्या गोष्टींनी सजवण्यात आला आहे.

सुमारे १७ एकर क्षेत्रात पसरलेल्या या फार्महाऊसमध्ये आंब्याची मोठी बाग आहे. त्यासोबतच ठिकठिकाणी नारळाची झाडेही पाहायला मिळतात. तसेच या ठिकाणी मोर आणि लांडोर असल्याचेही बोललं जाते. या फार्महाऊसच्या परिसरात चालण्यासाठी आणि वावरण्यासाठी काही ठिकाणी पेव्हर ब्लॉकचा वापर करण्यात आला आहे.

अशोक खरातने तुर्कीतून मागवलेले फर्निचर तसेच इतर अन्य साहित्यावर नियमानुसार कस्टम ड्युटी (Custom Duty) भरली गेली आहे की नाही, याची तांत्रिक तपासणी केली जाणार आहे. जर यात करचोरी आढळली, तर खरातच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे.