
अभिनेता प्रभासचा आज 41वा वाढदिवस आहे. प्रभासनं साऊथमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले. मात्र 'बाहुबली'नंतर प्रभास बॉलिवूडमध्ये चांगलाच गाजला. महत्वाचं म्हणजे या चित्रपटानंतर त्याची ओळख 'बाहुबली' या नावानेच झाली. त्याचा जन्म 23 ऑक्टोबर 1979 ला चेन्नईमध्ये झाला होता.

प्रभासबद्दल एक खास गोष्ट म्हणजे तो एका वेळी एकाच चित्रपटाचं चित्रीकरण करतो. 'बाहुबली' पूर्ण होण्यासाठी एकूण 5 वर्षांचा कालावधी लागला होता. या पाच वर्षात त्यानं एकही चित्रपट साइन केला नव्हता.

मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटासाठी त्यानं 25 कोटी रुपये घेतल्याची माहिती आहे. त्यानं या चित्रपटासाठी स्वत:वर खूप मेहनत घेतली होती.

2002 मध्ये त्यानं तेलुगु चित्रपट 'ईश्वर' पासून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं. यानंतर त्यानं राघवेंद्र, योगी, डार्लिंग, निरंजन, रेबेल आणि बाहुबली या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या.

आता त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांना खास भेट आहे. ती म्हणजे त्याच्या आगामी 'राधेश्याम' सिनेमातील प्रभासचा लुक रिलीज करण्यात आला आहे. आज या चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज करण्यात येणार आहे. अभिनेत्री पूजा हेगडेनं प्रभासचा लुक शेअर केला आहे.