
देव तारी त्याला कोण मारी... ही म्हण आता सत्यात उतरली आहे. बैलगाडा शर्यतीत घोडीवरून पडलेल्या तरुणाचे प्राण थोडक्यात बचावले आहे. शर्यतीत तरुणाचं निधन झालं असतं. पण मुक्या प्राण्यांच्या समय सूचकतेने तरुणाचे प्राण बचावले आहेत.

अंबेगाव तालुक्यातल्या विठ्ठलवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतील एक काळजाचा थरकाप उडविणारा क्षण पाहायला मिळाला. या शर्यतीत बैलगाडा घाटात धावत असताना बैलगाड्यासमोर पळणाऱ्या घोडीवर बसलेला युवक तोल जाऊन शर्यती मधेच बैलगाडा घाटातच खाली पडला.

पडल्यानंतर त्याने स्वतःला वाचवण्यासाठी जमीनीवर आडवा झाला. तरुण पडल्यानंतर मागून भरधाव वेगात येणाऱ्या बैलांच्या व बैलगाड्याच्या खाली आता घोडेस्वार सापडणार व त्याला मोठी दुखापत होणार असेच क्षणभर सर्वांना वाटले होते.

पण घाटात पडलेल्या तरुणाला पाहून भरधाव वेगात धावत येणाऱ्या बैलांच्या दोन्ही जोड्यांनी आगदी बैल गाड्यासह तरुणाच्या वरून उडी मारली आणि मोठी दुर्घटना टळली. यामध्ये तरुणाचे प्राण बचावले आहेत.

या अपघातात बचावल्याने बैलांच्या समय सूचकतेची व मुक्या प्राण्यांच्या माणसांप्रती असणाऱ्या सद्भावनांची सर्वत्र चर्चा होत आहे. घटनेचे फोटो सांगत आहे की, प्राण्यांमध्ये देखील माणसांप्रती प्रेम आहे.