
धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील बाळदे गावात 23 ऑगस्ट रोजी भटक्या कुत्र्यांनी वानरावर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वानराचा मृत्यू झाला. गावकऱ्यांनी वानराच्या पार्थिवार अंत्यसंस्कार करत पाच दिवस दुखवटा पाळला आहे.

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेला वानर जंगलात पळून गेला आणि उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. राजेंद्र पाटील यांना तो वानर मृतावस्थेत आढळून आल्यानंतर त्यांनी ही बाब गावकऱ्यांना सांगितली.

भावूक गावकऱ्यांनी वानराच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करत त्याला अखेरचा निरोप दिला. अंत्यसंस्कारावेळी संपूर्ण गाव शोकाकूल झालं होतं. इतकंच नव्हे तर, गावकऱ्यांनी पाच दिवसांचा दुखवटाही जाहीर केला आहे.

27 ऑगस्ट रोजी गावातील हनुमान मंदिर परिसरात दशक्रिया विधी पार पडला. हनुमान चालीसा पठण करून या विधीची सुरूवात झाली. गावातील साधारण अडीच ते तीन हजार लोकसंख्येपैकी सर्वच नागरिकांनी यात सहभाग घेतला. विशेष म्हणजे गावातील पुरुषांनी मुंडन करून शोक व्यक्त केला, तर महिलांनीही सुतक पाळून श्रद्धांजली वाहिली.

धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर प्रति पंढरपूर विठ्ठल-रुक्माई मंदिरात सामूहिक जेवणाचा कार्यक्रम झाला. या संपूर्ण कार्याला माजी आमदार संभाजीराव पाटील यांचं विशेष मार्गदर्शन लाभलं. होतं.