
'बालिका वधू', 'डोली अरमानों की' यांसारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री नेहा मर्दा नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या गरोदरपणातील समस्यांबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. नेहा म्हणाली, "सर्वजण मला हेच म्हणायचे की, खूप झालं काम.. आता कुटुंबाकडे लक्ष दे. कधी चान्स घेशील?"

"कोणत्याही पार्टीत केली तरी आंटी मला म्हणायची की कधीपर्यंत अशी एकटी येत राहशील? तेव्हा मला असं वाटायचं की आयुष तर माझ्यासोबत आहे, मग मी एकटी कशी? नंतर मला समजलं की ते आयुषबद्दल नाही तर बाळाबद्दल विचारत होते", असं ती पुढे म्हणाली.

"माझ्या मागे अशीच चर्चा व्हायची की, नेहाला सांगा की आता गरोदरपणाचा विचार कर म्हणून. हातातून वेळ निघून जातेय. काम तर होत राहील, पण मूल जन्माला घालणं पण महत्त्वाचं आहे. मी हे सर्व खूप ऐकत आले. तिचं करिअरवर जरा जास्तच लक्ष आहे, असेही टोमणे मारायचे", अशा शब्दांत तिने अनुभव सांगितला.

गेल्या 12 वर्षांत मी कोणत्या परिस्थितीचा सामना करतेय, हे मी कोणालाच सांगितलं नाही. कारण मला कोणाचीही दया नको होती. माझा तीन वेळा गर्भपात झाला होता, हे मी कोणाला सांगितलं नव्हतं. लग्नाच्या 3, 6 आणि 9 वर्षांनंतर माझा गर्भपात झाला होता, असा खुलासा नेहाने यावेळी केला.

अखेर लग्नाच्या 12 वर्षांनंतर नेहाने मुलीला जन्म दिला. वयाच्या 34 व्या वर्षी नेहा आई बनली होती. 12 वर्षांनंतर "जेव्हा मी मुलीला जन्म दिला, तेव्हा मनात एक वेगळंच समाधान होतं. आई झाल्यानंतर मी माझा व्यवसाय सुरू केला," असं नेहाने सांगितलं.