
बीएपीएस हिंदू मंदिर अबू धाबीने 'अ सिम्फनी ऑफ हार्मनी' नावाच्या एका विशेष संध्याकाळचे आयोजन केले होते. दिव्यांग व्यक्ती, समावेश आणि सामायिक मानवी मूल्यांना हा कार्यक्रम समर्पित होता. या भव्य, प्रेरणादायी कार्यक्रमाला युएईचे नेतृत्व, समुदायाचे प्रतिनिधी, कुटुंबे आणि हितचिंतकांसह 500 हून अधिक पाहुणे उपस्थित होते.

15 वर्षांचे अमिराती पियानोवादक आणि संगीतकार अहमद अल हाशिमी यांचे मनमोहक सादरीकरण हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होतं. तो ऑटिझम स्पेक्ट्रममधील आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठित तरुण कलाकार आहे. त्याने आठ कलाकृती सादर केल्या, ज्यात त्याच्या मूळ रचना आणि बीथोव्हेनच्या शास्त्रीय कलाकृतींचा देखील समावेश होता.

या मंदिरासाठी रचलेला त्यांचा "डार्क टू लाईट" हा विशेष कार्यक्रम मानवतेच्या आव्हानापासून शांतीकडे जाण्याच्या प्रवासाचे प्रतीक होता. "माझ्या संगीताचा संदेश प्रेम, शांती आणि सुसंवाद आहे. जेव्हा आपण खरोखर एकमेकांचे ऐकतो तेव्हा जग एक दयाळू ठिकाण बनतं. सहिष्णुता दिनापूर्वी, मला हा संदेश शेअर करताना आनंद होत आहे,” असं अहमद म्हणाले.

या कार्यक्रमातील सत्राच्या मध्यात, बीएपीएस हिंदू मंदिर अबू धाबीचे प्रमुख स्वामी ब्रह्मविहारीदास यांनी संगीताच्या परिवर्तनीय शक्तीवर आणि अपंग लोकांच्या धैर्यावर प्रकाश टाकला. समावेश, सक्षमीकरण आणि मानवी प्रतिष्ठेसाठी सातत्याने वचनबद्ध असलेल्या यूएई नेतृत्वाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी मंदिरातर्फे अहमद यांना श्रद्धा, कला आणि मानवी आत्म्याच्या मिलनाचे प्रतीक असलेले एक विशेष स्मृतिचिन्ह भेट देण्यात आलं. अहमद यांची आई इमान अलअलीली यांनाही त्यांच्या समर्पणाबद्दल सन्मानित करण्यात आले. युएई नेतृत्व आणि समुदायातील अनेक प्रमुख सदस्य - ब्रिगेडियर हमेद, महामहिम मुबारक अल अमरी, महामहिम मोहम्मद अल बलुशी, श्री झुबिन करकरिया आणि डॉ. विबू बोस - यांना त्यांच्या सततच्या पाठिंब्याबद्दल गौरविण्यात आले.

या सुंदर कार्यक्रमानंतर, अपंग व्यक्ती, यूएई नेतृत्व आणि पाहुण्यांमधील आनंदी आणि समान संवादामुळे भावनिक वातावरण निर्माण झाले. जिथे प्रत्येक व्यक्तीचा सन्मान, प्रोत्साहन आणि उन्नती केली जाते ही मंदिराची भूमिका या खास संध्याकाळी पुन्हा अधोरेखित झाली.