
निरोगी राहण्यासाठी आपण आहारात फळांचा समावेश करतो. अनेकजण फळे खाण्याऐवजी फळांचा रस पिण्याला पसंती देतात. मात्र, फळांचा रस कोणत्याही वेळी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरण्याऐवजी नुकसानकारक ठरू शकते.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ज्यूस पिण्याची एक निश्चित वेळ असते. त्यांच्या मते, सकाळची वेळ फळांचा रस पिण्यासाठी सर्वात उत्तम मानली जाते. रात्रभराच्या झोपेनंतर शरीराला उर्जेची गरज असते, जी ताज्या फळांच्या रसातून लगेच मिळू शकते.

सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यासोबत ज्यूस घेतल्यास शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते. वर्कआउट किंवा व्यायामानंतर अर्ध्या तासाने ज्यूस पिणे फायदेशीर ठरते. यामुळे व्यायामादरम्यान खर्च झालेली ऊर्जा पुन्हा मिळते.

सकाळी ज्यूस प्यायल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची पातळी संतुलित राहते. मात्र रात्री झोपण्यापूर्वी फळांचा रस कधीही पिऊ नये. यामध्ये नैसर्गिक साखर (Fructose) असते, ज्यामुळे रक्तातील साखर वाढू शकते आणि झोपेत अडथळा येऊ शकतो.

रात्री पचनसंस्था मंदावलेली असते. त्यासोबत जेवताना ज्यूस पिणे टाळावे, कारण यामुळे पचन प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊन गॅस किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो. दरम्यान ज्यूसमध्ये वरून साखर घालणे टाळा.

कधी पाकीटबंद ज्यूसपेक्षा घरी तयार केलेला ताजा रस प्या. या ज्यूसमध्ये फायबरचे प्रमाण कमी असल्याने शक्य असल्यास फळे खाण्याला प्राधान्य द्या.