
आजच्या डिजीटल युगात जिथे चिमुकल्यांच्या हातात मोबाईल आणि टॅब्लेट दिसत आहेत. तिथे आष्टी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भवरवाडी येथील विद्यार्थ्यांनी एक नवा आदर्श घालून दिला आहे.

या शाळेतील अगदी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर इतके सुंदर, मोत्यांसारखे आणि वळणदार आहे की ते पाहणाऱ्यांना कम्प्युटर टायपिंगचा भास होतो.

शिक्षक अनिल बेदरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेल्या एका अनोख्या उपक्रमामुळे या ग्रामीण शाळेची ओळख आता राज्यभर झाली आहे. सोशल मीडियावरही या विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षराचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

भवरवाडी शाळेत नियमित अभ्यासक्रमासोबतच सुंदर हस्ताक्षर कॅलिग्राफी लेखन आणि अक्षर रांगोळी लेखन हा विशेष उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे अक्षर तर सुधारलेच आहे.

पण त्याचबरोबर त्यांच्यातील एका वेगळ्या कलागुणांना वाव मिळाला आहे. विशेष म्हणजे, यासाठी कोणताही वेगळा वेळ न देता, मधल्या सुट्टीत विद्यार्थ्यांना एकत्र बसवून अक्षर रांगोळी व कॅलिग्राफी लेखनाचा सराव घेतला जातो.

या कलेमुळे विद्यार्थ्यांवर सकारात्मक परिणाम झाला असून, शाळेनंतरही ही मुले मोबाईलपासून दूर राहून घरी रांगोळी काढण्यात आणि कॅलिग्राफीचा सराव करण्यात दंग असतात. या अनोख्या उपक्रमाने विद्यार्थी व पालकही समाधानी असून, पालकांच्या मते या सुंदर हस्ताक्षरामुळे आणि कॅलिग्राफीमुळे त्यांच्या मुलांच्या बुद्धिमत्तेतही वाढ होत आहे.

स्थानिक आमदार सुरेश धस यांनी नुकतीच शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षराचे विशेष कौतुक केले. त्यांनी या उपक्रमासाठी शिक्षक व शाळा व्यवस्थापनाचे अभिनंदन केले.

या उपक्रमासाठी लागणारे रांगोळीचे सर्व साहित्य शाळा स्वतः पुरवते, तर कॅलिग्राफी लेखनासाठी लागणारे सर्व साहित्य गावचे सरपंच भरत भवर हे पुरवतात. शाळा, पालक आणि लोकप्रतिनिधींच्या या एकत्रित प्रयत्नातून ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेने आपली एक वेगळी आणि कौतुकास्पद ओळख निर्माण केली आहे.