Bigg Boss : मुनव्वरपासून एल्विशपर्यंत… ‘बिग बॉस’च्या या स्पर्धकांनीही खाल्ली आहे तुरुंगाची हवा
बिग बॉस हा केवळ मनोरंजनाचा शो नाही, तर स्पर्धकांच्या वैयक्तिक आयुष्यातील वाद आणि कायदेशीर पेचही यानिमित्ताने समोर येतात. अनुराग डोभाल, एल्विश यादव, मुनव्वर फारुकी यांसारख्या अनेक सेलिब्रिटींना ड्रग्ज, धार्मिक भावना दुखावणे किंवा इतर गंभीर आरोपांवरून अटक झाली होती.

सलमान खानचा लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो ड्रामा, वाद, भांडणं आणि सतत चर्चेत राहणारे स्पर्धक. शोमध्ये सहभागी होणाऱ्या सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्यापासून त्यांच्या भूतकाळातील वादांपर्यंत अनेक गोष्टींची चर्चा होत असते. ‘बिग बॉस 17’चा स्पर्धक अनुराग डोभाल पुन्हा एकदा चर्चेत आल्यानंतर या शोशी संबंधित सेलिब्रिटींच्या जुन्या कायदेशीर प्रकरणांनाही उजाळा मिळाला आहे. ‘यूके 07 रायडर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अनुरागसोबतच यापूर्वी बिग बॉसच्या घरात दिसलेले अनेक स्पर्धक कायदेशीर अडचणींमध्ये सापडले आहेत. विशेष म्हणजे, यापैकी काहींना अटकेनंतर तुरुंगातही राहावे लागले आहे. चला, जाणून घेऊया अशा स्पर्धकांबद्दल
एल्विश यादव - ‘बिग बॉस ओटीटी 2’चा विजेता आणि लोकप्रिय यूट्यूबर एल्विश यादव एका गंभीर प्रकरणामुळे चर्चेत आला होता. रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरवल्याच्या आरोपांशी संबंधित प्रकरणात त्याचे नाव समोर आले होते. या प्रकरणात नोएडा पोलिसांनी मार्च 2024 मध्ये एल्विशला अटक केली होती. त्याच्यावर वन्यजीव संरक्षण कायदा आणि एनडीपीएस कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. अटकेनंतर त्याला काही दिवस तुरुंगात राहावे लागले. त्यानंतर न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला.
मुनव्वर फारूकी - ‘बिग बॉस 17’चा विजेता मुनव्वर फारुकी याचा बिग बॉसच्या घरात प्रवेश होण्यापूर्वीच कायदेशीर वादांशी संबंध आला होता. 2021 मध्ये मध्य प्रदेशातील इंदूर येथे एका कॉमेडी शोदरम्यान धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आणि त्याला सुमारे 37 दिवस तुरुंगात राहावे लागलं. नंतर सर्वोच्च न्यायालयाकडून मुनव्वरला दिलासा मिळाला. या घटनेनंतरही त्याने आपल्या करिअरला पुन्हा उभारी दिली आणि पुढे ‘बिग बॉस 17’ची ट्रॉफी आपल्या नावावर केली.
राहुल महाजन - माजी केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजन हा ‘बिग बॉस’च्या घरातील चर्चित आणि मनोरंजक स्पर्धकांपैकी एक आहे. मात्र, ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होण्यापूर्वीच राहुल कायदेशीर प्रकरणात अडकला होता. 2006 मध्ये प्रतिबंधित ड्रग्जचे सेवन आणि त्यासंबंधीच्या आरोपांवरून दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली होती. अटकेनंतर त्याला तिहार तुरुंगात पाठवण्यात आले होते. यानंतर राहुल महाजन पुन्हा मनोरंजन विश्वात सक्रिय झाला आणि पुढे ‘बिग बॉस’सारख्या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्येही तो सहभागी झाला.
मोनिका बेदी - ‘बिग बॉस सीझन 2’मध्ये सहभागी झालेली अभिनेत्री मोनिका बेदी हिच्या आयुष्यातील कायदेशीर वादांची कहाणीही खूप गाजली होती. अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमसोबतच्या संबंधांमुळे आणि बनावट पासपोर्ट प्रकरणामुळे मोनिका बेदीला पोर्तुगालमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिचे भारतात प्रत्यार्पण करण्यात आले आणि तिला कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागलं. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मोनिका बेदीने आपल्या करिअरला पुन्हा सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. याच काळात ‘बिग बॉस’ हा तिच्या पुनरागमनातील महत्त्वाचा टप्पा ठरला.
अरमान कोहली - ‘बिग बॉस 7’मध्ये आपल्या आक्रमक स्वभावामुळे सतत चर्चेत राहिलेला अभिनेता अरमान कोहलीदेखील कायदेशीर अडचणीत सापडला होता. ऑगस्ट 2021 मध्ये NCB ने अरमान कोहलीच्या मुंबईतील जुहू येथील घरावर छापा टाकला होता. या कारवाईनंतर ड्रग्जशी संबंधित प्रकरणात त्याला अटक करण्यात आली. त्याच्यावर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणानंतर अरमान कोहलीला काही काळ तुरुंगात राहावे लागले
एजाज खान - ‘बिग बॉस 7’मध्ये सहभागी झालेला अभिनेता एजाज खानही कायदेशीर प्रकरणांमुळे चर्चेत राहिला आहे. शोमध्ये त्याच्या बेधडक स्वभावामुळे तो लोकप्रिय झाला होता. मार्च 2021 मध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) ड्रग्जशी संबंधित एका प्रकरणात एजाज खानला मुंबई विमानतळावरून अटक केली होती. या प्रकरणानंतर त्याला कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे लागले आणि तो मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्येही राहिला होता.