
बॉलिवूडमध्ये 70-80 च्या दशकात अभिनेत्री बबिताची वेगळी स्टाईल होती. अभिनेत्री बबिता या सिंधी कुटुंबातील असून त्यांचे पूर्ण नाव बबिता हरी शिवदासानी होतं. त्यांचे वडील हरी शिवदासानी देखील एक उत्तम अभिनेते होते. बबिता यांचा जन्म 20 एप्रिल 1947 ला पाकिस्तानमध्ये झाला होता, मात्र भारत-पाक विभाजनानंतर त्यांचं कुटुंब भारतात आलं. आज त्यांचा वाढदिवस आहे या निमित्तानं त्यांच्या जीवनाशी संबंधित काही न ऐकलेल्या कथा जाणून घेऊया.

बबिता यांनी 1966 साली दास लाख या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. त्या काळात बॉलिवूड चित्रपटांमध्ये त्यांना चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर त्यांचा 'राज' हा चित्रपट रिलीज झाला आणि या चित्रपटानं बबीता यांना एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली. खास गोष्ट अशी होती की या चित्रपटात त्यांच्या जोडीला राजेश खन्ना होते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की बबिता यांनी त्यांच्या संपूर्ण चित्रपट कारकीर्दीत फक्त 19 चित्रपट केले आहेत.

1971 मध्ये, बबिता यांच्या कारकीर्दीचा एक महत्त्वाचा चित्रपट ‘कल आज ओर कल’ प्रदर्शित झाला. या चित्रपटात रणधीर कपूर मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटादरम्यान दोघांची मैत्री झाली आणि ही मैत्री कधी प्रेमात रूपांतर झाली हे दोघांनाही कळलं नाही. नंतर त्यांनी लग्न केलं मात्र त्यांच्या वैवाहिक जीवनात अनेक समस्या आल्या.

रणधीर कपूर पंजाबचे होते. बबिता सिंधी कुटुंबातील होत्या. त्यामुळे दोन्ही कुटुंबं एकमेकांच्या विरोधात होती. मात्र प्रेम हे जात, प्रांत मानत नाही. त्या दोघांमधील प्रेम इतकं होतं की रणधीर कपूर त्या काळात आपल्या कुटूंबाशी असलेले संबंध तोडण्यास तयार झाले होते.

रणधीर कपूर यांनी या लग्नासाठी वडिलांशी बोलण्याची हिम्मत केली मात्र राज कपूर हे बबिताला त्यांच्या चित्रपटात घेण्यास पूर्णपणे तयार होते मात्र बबिता यांना घरातली सून करण्यास तयार नव्हते.

लग्नासाठी बबिताने रणधीरला शेवटच्या वेळी घरी विचारण्यास सांगितलं, रणधीर प्रेमात होते आणि त्यांनी घरी लग्नासाठी विचारलं. मात्र कुटुंबातील सदस्यांनी अशी अट घातली की जर त्यांनी बबितासोबत लग्न केलं तर बबिताला तिचं फिल्मी करिअर सोडावे लागेल. बबितानं अट मान्य केली आणि फिल्मी करिअरला निरोप दिला.

आणि मग दोघांनी अगदी साध्या पद्धतीनं मुंबईत लग्न केलं. लग्नानंतर रणधीर आणि बबिता एका वेगळ्या फ्लॅटमध्ये राहत होते. करिश्मा कपूरचा जन्म 1974 मध्ये आणि करीनाचा 1980 मध्ये झाला. बबितानं तिचे फिल्मी करिअर सोडलं, मात्र त्यांच्या दोन्ही मुलीनी त्यांच्या पायावर उभं राहवं अशी त्यांची इच्छा होती.

मुलींच्या फिल्मी करिअरसाठी रणधीर कपूर तयार नव्हते मात्र बबितानं निर्णय घेतला. जेव्हा करिश्माने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले तेव्हा रणधीर आणि बबिताचं नातं तुटण्याच्या मार्गावर होतं. 1988 मध्ये बबिताने रणधीरला आपल्या दोन्ही मुलींसह सोडले आणि दोन्ही मुलींचं करिअर करण्यास सुरवात केली.