18 कोटींचा बजेट, कमावला 190% नफा.. नेटफ्लिक्सवर येताच ‘या’ चित्रपटाने ‘राजा शिवाजी’ सिनेमालाही टाकलं मागे
अवघ्या 18 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 190 टक्क्यांहून अधिक नफा कमावला आहे. नेटफ्लिक्सवर येताच हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होऊ लागला आहे.

नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकतेच काही नवीन चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित झाले आहेत. यापैकीच एक चित्रपट पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे. अॅक्शन आणि सस्पेन्सचा भरणा असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 2 तास 21 मिनिटांच्या या चित्रपटाने रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' आणि अक्षय कुमारच्या 'भूत बंगला' या चित्रपटांनाही मागे टाकलं आहे.

ज्या चित्रपटाबद्दल आम्ही इथे बोलत आहोत, त्याचं नाव 'ब्लास्ट' असं आहे. हा मूळ तमिळ भाषेतील अॅक्शन थ्रिलर चित्रपट असून त्यात अर्जुन सर्जा, प्रिती मुकुंदन आणि अभिरामी यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात एका भ्रष्ट कॉर्पोरेट सिंडिकेटशी दोन हात करणाऱ्या मार्शल आर्टिस्टच्या एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे. 28 मे 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा बजेट फक्त 18 कोटी रुपये आहे.

अवघ्या 18 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात 79.77 कोटी रुपये कमावत 190 टक्क्यांहून अधिक नफा मिळवला होता. 25 जून रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर स्ट्रीम झाला आणि ओटीटीवर येताच तो काही दिवसांतच पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे.

या चित्रपटातील कुटुंबाचे प्रमुख राजाराम हे एक माजी मार्शल आर्ट्स प्रशिक्षक असतात. आपल्या मुलीला गरजेच्या वेळी स्वत:चं संरक्षण करता यावं, यासाठी तिला ते कौशल्य शिकवतात. अचानक राजाराम यांच्या सुखी कुटुंबात एक कॉर्पोरेट समूह हस्तक्षेप करतो आणि कथेला पूर्णपणे वेगळं वळण लागतं. तेव्हा राजाराम, त्यांची पत्नी आणि मुलगी त्या शत्रूंना सामोरं जातात.

नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या 'ब्लास्ट' पहिल्या क्रमांकावर, 'राजा शिवाजी' दुसऱ्या क्रमांकावर, 'भूत बंगला' तिसऱ्या स्थानी, 'वॉइसमेल्स ऑफ इसाबेल' चौथ्या स्थानी, 'धुरंधर : द रिव्हेंज' पाचव्या क्रमांकावर, 'लिटिल ब्रदर' सहाव्या स्थानी, 'मां बेहेन' सातव्या क्रमांकावर, 'कारा' आठव्या स्थानी, '29' नवव्या आणि 'हसबंड्स इन अॅक्शन' हा दहाव्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे.