
आजच्या काळात चित्रपटांमध्ये हिंसा, अत्याचार आणि आक्रमक संवाद यांचेच वर्चस्व पाहायला मिळत आहे. पण कधीकाळी असा सुवर्णकाळ होता, जेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र बसून निरागस आणि हृदयस्पर्शी चित्रपट पाहायचे. अशाच एका अविस्मरणीय चित्रपटाची आठवण आजही ताजी आहे. १९८२ मध्ये प्रदर्शित झालेला 'नदिया के पार.'

या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला नाही, तर आजही 'गुंजा' आणि 'चंदन' ही जोडी प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. चित्रपटाच्या ४३ वर्षांच्या पूर्तीनिमित्त अभिनेत्री साधना सिंग यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगांवकर यांच्याशी असलेल्या नात्याबद्दल मन मोकळे केले.

साधना यांनी सांगितले की, "‘नदिया के पार’च्या आधीच सचिन हे मोठे स्टार होते. मी मुंबईत नवीन होते तेव्हा एका कार्यक्रमात आमची पहिली भेट झाली होती. पुढे जेव्हा या चित्रपटासाठी माझी निवड झाली, तेव्हा सचिनना माहीत नव्हतं की हिरोईन कोण आहे. माझा फोटो पाहताच ते आनंदाने म्हणाले, 'अरे, ही तर साधना आहे! मी तिला ओळखतो!'"

त्या पुढे म्हणतात, "शूटिंगदरम्यान आमची मैत्री खूप घट्ट झाली. इतकी की लोकांनी सचिन आणि माझे अफेअर असल्याच्या अफवा पसरवायला सुरुवात केली. पण आमच्यात फक्त शुद्ध आणि निखळ मैत्री होती. त्यापलीकडे काहीच नव्हतं. दुर्दैवाने एका तिसऱ्या व्यक्तीने आमच्या या मैत्रीत विष कालवलं. त्यामुळे सचिन माझ्या पतीपासून आणि नंतर माझ्यापासूनही दुरावले. आजही आम्ही भेटलो तर ते खूप प्रेमाने बोलतात, पण ती जुनी जवळीक आणि मैत्री आता पुन्हा येण्याची शक्यता कमी आहे."

'नदिया के पार' हा चित्रपट केवळ १८ लाख रुपयांच्या बजेटमध्ये बनला आणि त्याने तब्बल ५.४ कोटी रुपये कमावले होते. म्हणजेच खर्चाच्या ३० ते ४० पट अधिक कमाई केली होती. आजही IMDb वर या चित्रपटाला ८.२ चे उत्तम रेटिंग आहे, जे अनेक आधुनिक ब्लॉकबस्टर चित्रपटांनाही मिळत नाही.

या चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत पहिले म्हणजे 'कौन दिशा में लेके चला रे बटोहिया' आणि दुसरे गाणे 'जोगी जी धीरे धीरे.' हे गाणे लग्नसोहळ्यात, प्रवासात आणि विशेष प्रसंगी आजही आवर्जून ऐकले जातात. या कथेचाच प्रभाव इतका होता की, त्यावरूनच सूरज बडजात्या यांनी नंतर 'हम आपके हैं कौन' ही सुपरहिट फिल्म बनवली, ज्यात सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांची जोडी गाजली. 'नदिया के पार' हा केवळ एक चित्रपट नव्हता, तर एक काळ, एक संस्कृती आणि निरागस प्रेमाची आठवण आहे – जी आजही तितकीच ताज्या आणि सुंदर वाटते.