
Bollywood Actress Villain Role: बहुतांश वेळेला बॉलीवूडचे चित्रपट जीवनातील दोन प्रमुख पैलूंवर आधारित असतात. एक भूमिका असते सकारात्मक, नायकाची, तर दुसरी नकारात्मक, म्हणजे खलनायक. नायक चित्रपटात सकारात्मकता आणतो, तर खलनायक आपल्या नकारात्मक बाजूने गोष्टी बिघडवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. बॉलिवूडमध्ये जुन्या काळात नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री खूप कमी होत्या. त्या काळात, यशाच्या शिखरावर असणाऱ्या अभिनेत्रींसाठी अशा भूमिका अयोग्य मानल्या जात होत्या. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. अशा अनेक अभिनेत्री दिसतात, ज्यांनी आत्मविश्वासाने नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. त्यातला 5 व्या अभिनेत्रीचं नाव वाचून तर तुम्ही थक्क व्हाल..

प्रियांका चोप्रा - कित्येक दशकं अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणाऱ्या अभिनेत्री प्रियांका चोप्राचा 'ऐतराज' चित्रपटातील अभिनय आपण कसा विसरू शकतो? तिने साकारलेली एका डॉमिनेटिंग बॉसची भूमिका आजही अनेकांच्या स्मरणात ताजी आहे. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच नकारात्मक भूमिका स्वीकारण्याचा तिचा धाडसी निर्णय खरोखरच कौतुकास्पद होता. या भूमिकेसाठी तिला 2004 साली सर्वोत्कृष्ट नकारात्मक अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता.

काजोल - आपल्या जवळपास 30 वर्षांच्या करिअरमध्ये काजोलने अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण निगेटीव्ह भूमिकेत तिने आणखनीच कमाल केली. त्याचं उदाहरण म्हणजे 1997 साली आलेला 'गुप्त: द हिडन ट्रुथ', हा तिचा चित्रपट. यात तिने ईशा नावाच्या एका सायको लव्हरची भूमिका साकारली होती. साहिलबद्दल असलेली तिची संरक्षक देहबोली आणि तो फक्त आपलाच आहे हा तिचा आग्रह, यामुळे तिची भूमिका अजून उठावदार झाली. पिक्चरच्या शेवटी आलेला ट्विस्ट अनेकांसाठी धक्कादायक होता.

विद्या बालन - मनमोहक 'परिणीता'च्या भूमिकेपासून ते 'द डर्टी पिक्चर'मधील सिल्क स्मिताच्या भूमिकेपर्यंत, विद्या बालनने आपल्या कारकिर्दीत विविध प्रकारच्या भूमिका सहजतेने साकारल्या आहेत. पण 'इश्किया'मधील एका निर्दयी खलनायिकेच्या भूमिकेतून विद्याने सिद्ध केलं की कोणतंही पात्र, अगदी नकारात्मक भूमिकाही सहज साकारण्याची क्षमता तिच्यामध्ये आहे.

कतरिना कैफ - एवढा निरागस चेहरा असलेली व्यक्ती नकारात्मक भूमिका कशी काय साकारू शकते ? पण कतरिना कैफसाठी काहीही अशक्य नाही. 'रेस'मधील डार्क भूमिकेने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली.

प्रीती झिंटा - ती नेहमीच तिच्या क्यूट आणि बबली भूमिकांसाठी ओळखली जाते. मात्र, 'अरमान' या चित्रपटाद्वारे तिने या प्रतिमेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. तिची सोनिया कपूरची निगेटीव्ह भूमिका आजही लोकांच्या आठवणीत आहे. अनेकांसाठी हा आश्चर्याचा मोठा धक्का होता.

उर्मिला मातोंडकर - उर्मिला म्हटलं की वैविध्यपूर्ण भूमिका आल्याच, पण काही चित्रपटांत ती खास छाप सोडून जाते. 'प्यार तूने क्या किया' या चित्रपटातील उर्मिला मातोंडकरची वेडसर प्रेयसीची भूमिका, ही तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट कामापैकी एक म्हटलं तर वावगं ठरणार नाही. चित्रपट फ्लॉप झाला तरी, उर्मिलाच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडली.

बिपाशा बसु - 'जिस्म' चित्रपटातील बिपाशा बसूच्या भूमिकेच खूप कौतुक झालं. यामध्ये, ती मोहाच्या जाळ्यात अडकून आपल्या करोडपती पतीला ठार मारण्याचा प्रयत्न करते. चित्रपटातील तिच्या कामाने प्रेक्षकांना प्रभावित केलं. या भूमिकेने केवळ तिच्या करिअरला उत्तम सुरुवातच दिली नाही, तर इंडस्ट्रीनेही तिची दखल घेतली. अजनबीमध्येही तिने निगेटीव्ह भूमिकेत दिली होती.

कोंकणा सेन शर्मा - 'एक थी डायन' या चित्रपटात घातक चेटकिणीच्या भूमिकेत कोंकणा सेन शर्माचा अभिनय उत्कृष्ट होता. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नसली तरी, तिच्या अभिनयाने चाहत्यांना प्रभावित केलं.

अमृता सिंग - 'कलयुग' चित्रपटातील पॉर्न टायकूनची भूमिका ही अमृता सिंगपेक्षा, अधिक उत्तमरित्या कोणीही साकारू शकलं नसतं. एक कणखर आणि निर्दयी व्यावसायिक महिलेच्या भूमिकेसाठी अमृताचं खूप कौतुक झालं. हा तिच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा होता.