
चंद्रपूर जिल्ह्याची ओळख असलेल्या वाघांच्या मुक्त संचारामुळे चंद्रपूर-मुल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आज चंद्रपूर-मुल राष्ट्रीय महामार्गावर मामा मेल या प्रसिद्ध आणि अतिशय धाडसी वाघाने तब्बल अर्धा तास ठिय्या मांडला होता. यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

चंद्रपूर-मुल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 वरील अगडी फायरलाईन परिसरामध्ये दुपारच्या सुमारास ही घटना घडली. हा परिसर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या (TATR) बफर क्षेत्राला लागून असल्यामुळे या ठिकाणी कायमच वन्यप्राण्यांचा येथे नेहमीच वावर असतो.

‘मामा मेल’ या नावाने ओळखला जाणारा हा वाघ आपल्या धीट स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. त्याला गाड्यांचा आवाज किंवा माणसांची उपस्थिती याची अजिबात पर्वा नसते. तो मुक्तपणे संचार करतो.

मिळालेल्या माहितीनुसार, मामा मेल या वाघाने महामार्गाच्या अगदी जवळच दोन बैलांची शिकार केली होती. शिकार केल्यामुळे तो परिसरातच वावरत होता. विश्रांती घेण्यासाठी त्याने थेट महामार्गाच्या मध्यभागीच बसला.

रस्त्याच्या मध्ये वाघ ऐटीत बसल्याने चंद्रपूरहून मुलकडे आणि मुलकडून चंद्रपूरकडे जाणारी वाहने दोन्ही बाजूंना थांबली. साधारण अर्धा तास ही वाहतूक थांबवावी लागली. वाघ रस्त्याच्या मध्यभागी शांतपणे बसलेला असताना अनेक वाहनचालक आणि पर्यटकांनी सुरक्षित अंतर राखत हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला.

यावेळी वाघाला पाहण्याची भीती आणि उत्सुकता नागरिकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी तातडीने पाऊले उचलली.

वन कर्मचाऱ्यांनी वाहने आणि वाघ यांच्यात सुरक्षित अंतर ठेवून, रस्त्यावर लोकांची अनावश्यक गर्दी होणार नाही याची काळजी घेतली. वाघाला हुसकावून न लावता, तो स्वतःहून कधी पुन्हा जंगलात जातो, यासाठी वेळ घेतला. साधारण अर्धा तास शांतपणे बसल्यानंतर 'मामा मेल' वाघ स्वतःच्या मर्जीने रस्त्यावरून उठून जंगलाच्या दिशेने निघून गेला.

त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाहतूक हळूहळू पूर्ववत केली. दरम्यान हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 वन्यप्राण्यांच्या हालचालींमुळे गेल्या काही वर्षांत अनेक वेळा चर्चेत आला आहे. वन्यजीव आणि मानवी वस्ती यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे या मार्गावर वन्यप्राणी दिसण्याचे प्रमाण वाढले आहे.