
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया हा जयघोष आता हळूहळू कानावर पडू लागला आहे. गणोशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून सर्वत्रच लाडक्या बाप्पााच्या आगमनाची जोरदार तयारी पाहायला मिळत आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध मंडळातील गणपती बाप्पाच्या आगमन सोहळे मोठ्या थाटात पार पडताना दिसत आहे. यंदा 7 सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे. मात्र त्यापूर्वीच तयारी, सजावट यासाठी गणेशोत्सव मंडळ लाडक्या बाप्पााला काही दिवस आधीच मंडपात विराजमान करतात.

मुंबईतील तरूणाईचं खास आकर्षण असलेल्या 'चिंचपोकळीच्या चिंतामणी'चा आज शनिवारी 31 ऑगस्टला आगमन सोहळा पार पडत आहे.

आता 'चिंचपोकळीच्या चिंतामणी'चा पहिला फोटो समोर आला आहे. या फोटोत 'चिंचपोकळीच्या चिंतामणी'ची सुंदर मुर्ती पाहायला मिळत आहे.

यात बाप्पाला चिंतामणी रंगाचे धोतर नेसवलेले दिसत असून, त्यावर निळ्या रंगाचा शेला पाहायला मिळत आहे. त्यासोबत गणपती बाप्पाच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट, सोन्या-चांदीचे दागिनेही परिधान केले आहेत.

विशेष म्हणजे यंदा 'चिंचपोकळीच्या चिंतामणी'च्या प्रभावळीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

मुंबईतील सर्वात जुन्या मंडळांपैकी एक म्हणून चिंचपोकळीतील चिंतामणी गणेशोत्सव मंडळाला ओळखले जाते. यंदा चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचं हे 105 वे वर्ष आहे.

'चिंचपोकळीच्या चिंतामणी'च्या आगमनासाठी लाखो भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. सध्या लालबाग, परळ, चिंचपोकळीतील रस्त्यांवर मोठ्या संख्येने तरुणाई आगमन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी जमा झाली आहे.

चिंतामणीचा बाप्पा हा आगमनाधीश म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच मोठ्या थाटात हा आगमन सोहळा पार पडत असल्याचे दिसत आहे.