
चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर बेस्टच्या बसला आग लागल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

या घटनेनंतर अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, ही बस जे मेहता मार्गाकडे जाणारी होती. चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ बाहेर थांबलेली असताना अचानक तिला पेट घेतला. आगीच्या धुरामुळे प्रवाशांमध्ये एकच धावपळ झाली.

चर्चगेट स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ बाहेर आग लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून फास्ट लोकल गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर वळवण्यात आल्या होत्या. यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला.

यानंतर मुंबई अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले.

मात्र, बसला आग कशामुळे लागली, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.

या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.