
‘सीआयडी’ फेम फ्रेड्रिक्स अर्थात अभिनेता दिनेश फडणीस याचं निधन झालं. सोमवारी रात्री, वयाच्या 57 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Photos : Instagram)

गेल्या काही दिवसांपासून दिनेश फडणीस हे आजारी होते. त्यांचं यकृत निकामं (लिव्हर डॅमेज) झाल्याने रुग्णालयात उपचार सुरू होते, अशी माहिती त्यांच्याच ‘सीआयडी’ मालिकेतील सहकलाकार दया याने दिली होती.

दिनेश फडणीस हे गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन सृष्टीत कार्यरत होते. मात्र सीआयडीमुळे त्यांना खरी ओळख मिळाली. सीआयडीमधील फ्रेड्रिक्सच्या भूमिकेमुळे ते घराघरांत पोहोचले. तसेच अदालत, तारक मेहता का उलटा चश्मा मालिकेतही ते झळकले.

‘सीआयडी’ शो आता टेलिकास्ट होत नसला तरी, शोमधील अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सीआयडी व्यतिरिक्त दिनेश यांनी आमिर खानसोबत सरफरोश चित्रपटात काम केलं होतं. तसेच हृतिक रोशन स्टारर ‘सुपर 30’ सिनेमातही त्यांची भूमिका होती.

दिनेश फडणीस यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच त्यांचे चाहतेही या बातमीमुळे शोकाकुल झाले आहेत.