
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच तबांखूजन्य उत्पादन क्षेत्रातील लोकांना तसेच गुंतवणूकदार आणि ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. कारण तंबाखूशी निगडित असलेल्या उत्पादनांवर सरकारने एक्साईज ड्युटी वाढवण्याचा निर्णय घेतला होता.

त्याची 1 फेब्रुवारी रोजीपासून अंमलबजावणी केली जाणार आहे. या निर्णयाचा थेट परिणाम आता बाजारावर तसेच तांबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर पडणार आहे. सरकारच्या या निर्णयानंतर आता सिगारेट ओढणे महाग होणार आहे.

सरकारच्या या निर्णयाचा परिणाम शेअर बाजारावरही झाला आहे. विशेषत: आयटीसी आणि ग्रॉडफे फिलिप्स या कंपन्यांच्या शेअरचा भाव खाली आला आहे. सरकारने डिसेंबर 2025 मध्ये केंद्रीय उत्पादन शुल्क (सुधारणा) विधेयक मंजूर करून घेतले होते.

या सुधारणेअंतर्गत सिगारेट तसेच अन्य तंबाखूजन्य उत्पादनांवर तात्पुरत्या उत्पादन शुल्काऐवजी कायमस्वरूपी उत्पादन शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. वित्त विभागाच्या अधिसूनचेनुसार आता येत्या 1 फेब्रुवारीपासून सिगारेटच्या लांबीनुसार प्रति 1000 सिगारेटवर 2050 रुपयांपासून ते 8500 रुपयांपर्यंतचे उत्पादन शुल्क आकारले जाईल. हा कर 40 टक्क्यांच्या जीएसटीव्यतिरिक्त असेल.

या क्षेत्रातील तज्ज्ञांनुसार आता 75 ते 85 मीमी लांब असलेल्या सिगारेटच्या उत्पादन खर्चावर साधारण 22 ते 28 टक्क्यांपर्यंतची वाढ होईल. त्यामुळेच प्रत्येक सिगारेटची किंमत आता दोन ते तीन रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. म्हणजेच भविष्यकाळात सिगारेटचा भाव वाढणार आहे.