
अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) यांच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. लग्नापूर्वीचे सर्व विधी मोठ्या थाटामाटात साजरे केले जात आहेत. दोघांच्या प्रत्येक फंक्शनचे फोटो सोशल मीडियावर खूप पसंत केले जात असून, आता दोघेही आज लग्नगाठ बांधणार आहेत.

मात्र, लग्नाआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. मिड डेच्या रिपोर्टनुसार, लग्नानंतर दोघांचा एक रेड कार्पेट इव्हेंट होणार होता, जिथे ते मीडिया फोटोग्राफर्सना भेटून खास फोटो क्लिक करणार होते. मात्र, आता तो कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

अभिनेत्रीच्या एका जवळच्या स्त्रोताकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या लग्नाचा रेड कार्पेट कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. मुंबईतील वाढत्या ओमिक्रॉन संख्येमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. लग्नाला फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत.

तरी तुम्ही सर्वांनी त्यांच्यावर खूप प्रेम आणि आशीर्वादांचा वर्षाव करावा, जे त्यांच्या जीवनाच्या नवीन सुरुवातीसाठी खूप महत्वाचे आहे. धन्यवाद, असे या निवेदनात म्हटले आहे.

सोमवारी दोघांचा एक संगीत सोहळा पार पडला, ज्यामध्ये कंगना रनौतपासून एकता कपूरपर्यंत सर्वांचा समावेश होता. आता आज दोघेही महाराष्ट्रीय पद्धतीने लग्न करणार आहेत.