
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री दिया मिर्झा फार कमी चित्रपटांमध्ये दिसली आहे, परंतु तिने केलेल्या चित्रपटांची संख्या नेहमीच तिची उपस्थिती दर्शवण्यात यशस्वी झाली आहे. ‘मिस एशिया पॅसिफिक’चा किताब जिंकल्यानंतर तिच्यासाठी चित्रपटसृष्टीची दारे उघडली गेली. चेहऱ्यावर नेहमी गोड हसू असणाऱ्या दियाचा जन्म 9 डिसेंबर 1981 रोजी हैदराबादमध्ये झाला.

दियाची आई दीपा बंगाली हिंदू आहे, तर तिचे वडील फ्रँक हेड्रिच जर्मन आहेत. वयाच्या चौथ्या वर्षी तिच्या पालकांचा घटस्फोट झाला. दियाच्या आईने हैदराबादचे रहिवासी अहमद मिर्झा यांच्याशी दुसरं लग्न केलं, त्यानंतर दियाने तिच्या नावासह मिर्झा हे आडनाव लिहायला सुरुवात केली.

दिया मिर्झाने आपले शिक्षण हैदराबादमधून पूर्ण केले आहे. कॉलेजमध्ये असतानाच तिने कामाला सुरुवात केली होती. ती एका मीडिया फर्ममध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होती. यादरम्यान तिला लिप्टन, वॉल्स आईस्क्रीम, इमामी आणि इतर कंपन्यांसह सर्व मोठ्या कंपन्यांकडून मॉडेलिंगच्या ऑफर मिळू लागल्या.

दिया मिर्झाने 2000 साली ‘फेमिना मिस इंडिया’ या स्पर्धेत भाग घेतला होता आणि ती सेकंड रनर अप ठरली होती. तिने ‘मिस इंडिया’ स्पर्धेत ‘मिस ब्युटीफुल स्माइल’, ‘मिस एव्हॉन’ आणि ‘मिस क्लोजअप स्माइल’ हे किताब तिने पटकावले होते. वयाच्या 18व्या वर्षी दियाने ‘मिस एशिया पॅसिफिक’चा किताब पटकावला. त्याच वर्षी प्रियांका चोप्राने ‘मिस वर्ल्ड’ आणि लारा दत्ताने ‘मिस युनिव्हर्स’चा किताब पटकावला होता.

दिया मिर्झाने 2001 मध्ये 'रेहना है तेरे दिल में' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता आर माधवन होता. हा चित्रपट तरुणाईला खूप आवडला होता. यामध्ये दियाचा साधेपणा लोकांना पटला. यानंतर दिया 'दीवानापन', 'तुमको ना भूल पायेंगे', 'दम', 'परिणीता', 'लगे रहो मुन्नाभाई' आणि 'संजू'सह अनेक चित्रपटांमध्ये दिसली.

दीया मिर्झाने तिचा बिझनेस पार्टनर साहिल संगाला दीर्घकाळ डेट केल्यानंतर 18 ऑक्टोबर 2014 रोजी दिल्लीत लग्न केले. मात्र, हे नाते फार काळ टिकले नाही. 2019 मध्ये दोघेही परस्पर संमतीने वेगळे झाले. सरत्या वर्षात तिने वैभव रेखी याच्याशी लग्नगाठ बांधली असून, नुकताच एका मुलाला जन्म दिला आहे.