
'दंगल' या पहिल्या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या माजी अभिनेत्री जायरा वसीमने (Zaira Wasim) आपल्या कारकिर्दीत केवळ तीन चित्रपटांमध्ये काम केले. पण इतक्या कमी वेळातही लोकांना तिचे काम खूप आवडले. जायरा वसीमचा जन्म 23 ऑक्टोबर 2000 रोजी श्रीनगरमध्ये झाला. तिच्या अचानक चित्रपटसृष्टी सोडण्याच्या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला होता.

‘दंगल’ सुपरहिट झाल्यानंतर जायरा वसीम पुन्हा एकदा ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटात आमिर खानसोबत दिसली आणि पुन्हा तिने तिच्या पात्रासाठी प्रशंसा मिळवली. यानंतर जायरा प्रियांका चोप्रासोबत ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटात दिसली. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर जायराने चित्रपटसृष्टी सोडण्याची घोषणा केली.

झायरा वसीमने सोशल मीडियावर लिहिले की ती तिच्या कामावर खूश नाही, कारण ते तिला तिच्या धर्मापासून दूर नेत आहे. तिने पुढे लिहिले की, अभिनेत्री बनल्यामुळे ती इस्लामपासून दूर होत आहे. यामुळे आता ती फिल्म इंडस्ट्री सोडत आहे.

2017 मध्ये जायरा वसीमची विमानात छेडछाड झाली होती. हे गैरवर्तन दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या विमानात घडले, हे जायराने एका व्हिडीओद्वारे उघड केले होते. जायराचा हा व्हिडीओ लगेच व्हायरल झाला होता. विनयभंग करणारा सहप्रवासी विकास सचदेवाला नंतर पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली.

जायराला 10 वी बोर्डात 92 टक्के गुण मिळाले होते. त्यानंतर जम्मू-काश्मीरच्या तत्कालीन मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी जायराची भेट घेतली आणि तिचे अभिनंदन केले. मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या होत्या की, ती काश्मीरच्या तरुणांसाठी आदर्श आहे. जायराने मेहबूबा मुफ्तींसोबतचा स्वतःचा फोटोही पोस्ट केला होता. यानंतर अनेक फुटीरतावाद्यांनी यासाठी जायराला ट्रोल केले. काही वेळातच जायराने तो फोटो डिलीट केला आणि फेसबुकवर माफी मागितली.