
मुंबई | 19 मार्च 2024 : स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेने अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिला वेगळी ओळख दिली. या मालिकेने मधुराणीला अरूंधती म्हणून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवलं.

तीन मुलांची आई आणि तिचं जग याचं यावर आधारित असलेली ही मालिका आणि त्यातील अरुंधती देशमुख हे पात्र अल्पावधित लोकप्रिय ठरलं. मधुराणीने साकारलेली आई प्रेक्षकांना आपलीशी वाटली.

अरुंधती ही भूमिका साकारणारी मधुराणी प्रभुलकर हिने या आधी काही सिनेमांमध्ये काम केलं आहे. नवरा माझा नवसाचा या सिनेमात तिने काम केलंय. आता मधुराणी वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनयासोबतच मधुराणीला वाचनाचीही प्रचंड आवड आहे. कविता ती उत्तम प्रकारे सादर करते. याच्यशीच संबंधित कार्यक्रमातून मधुराणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधीही मधुराणी हिने कवितांचे कार्यक्रम केले आहेत.

काही वाचलेलं काही वेचलेलं... या नव्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मधुराणी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा कवितांचा कार्यक्रम आहे. यात मधुराणी कवितांचं सादरीकरण करते. ठाण्याच्या गडकरी रंगायतन, दादरच्या शिवाजी मंदीर, नाशिकच्या कालिदास कलामंदिर या ठिकाणी हा कार्यक्रम सादर झाला आहे. या पुढेही वेगवेगळ्या शहरात हा कार्यक्रम सादर होणार आहे.