
एक कॉलेज... त्या कॉलेजमधील मित्र- मैत्रिणींचा ग्रुप, त्यांची भांडणं- राडे अन् प्रेम... पण जरी असं असलं तरी काहीही झालं तरी मैत्रीसाठी धावून जाणारे मित्र... हे सगळं पुन्हा एकदा थिएटरमध्ये अनुभवता येणार आहे.

कारण ब्लॉकबस्टर 'दुनियादारी' सिनेमाची टीम पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. अभिनेता अंकुश चौधरी याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलीय. यात त्याने 'दुनियादारी' सिनेमाविषयी भाष्य केलंय.

11 वर्षांनंतर पुन्हा एकदा थिएटरमध्ये… ‘दुनियादारी’, अशी पोस्ट 'दुनियादारी' सिनेमातील कलाकारांकडून शेअर करण्यात आली आहे. यावरून प्रेक्षकांनी अनेक तर्क-वितर्क लावले आहेत.

'दुनियादारी' च्या टीमकडून एक पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. या 'दुनियादारी'च्या शोची वेळ लिहिण्यात आली आहे. मात्र सिनेमाची रिलीज डेट लिहिण्यात आलेली नाही. त्यामुळे सिनेमाची घोषणा जरी झाली असली तरी तो रिलीज कधी होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

'दुनियादारी' चा हा सिक्वेल असल्याचं बोललं जात आहे. सईने काही दिवसांआधी दिलेल्या एका मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला होता. लवकरच 'दुनियादारी' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सईने म्हटलं होतं.