
अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेता विराजस कुलकर्णी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. या दोघांची लगीनघाई सुरू झाली असून नुकतंच अभिनेत्री सानिया चौधरीनं त्याचं केळवण केलं आहे. या केळवणाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

लग्नाच्या तयारीची खरी सुरुवात ही केळवणापासूनच होते. शिवानीची जिवलग मैत्रीण सानिया हिने केळवणासाठी या दोघांना घरी बोलावलं आणि त्यांचा पाहुणाचार केला. शिवानी आणि विराजसचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला.

शिवानी आणि सानिया या एकमेकांच्या खूप चांगल्या मैत्रिणी असून त्या एकमेकींना बहिणी मानतात. 'केळवण' असं कॅप्शन देत सानियाने हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

विराजस आणि शिवानी हे गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 6 जानेवारी रोजी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत या दोघांनी साखरपुडा केला. आता 7 मे रोजी ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे.

शिवानी लवकरच अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांची सून होणार आहे. विराजस हा प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता आहे. विराजस आणि शिवानी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकमेकांसोबतचे फोटो नेहमीच शेअर करतात. मात्र सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या लग्नसोहळ्याला जेव्हा दोघांनी एकाच रंगसंगतीचे कपडे परिधान करत हजेरी लावली, तेव्हापासून या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या.