
राहुल वैद्यला आता प्रत्येक जण ओळखतो, राहुलने केवळ आपल्या गायनानंच नाही तर आपल्या धमाकेदार स्टाईलने सर्वांचं मन जिंकलं. मात्र राहुलशी संबंधित अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला क्वचितच माहीत असतील. आज, राहुलच्या वाढदिवसानिमित्त, आम्ही त्याच्याशी संबंधित खास गोष्टी तुम्हाला सांगतोय.

फार कमी लोकांना माहित आहे की राहुल लहानपणापासूनच कामाला लागला. त्याने अनेक चित्रपट आणि टीव्ही जाहिरातींमध्ये आपला आवाज दिला आहे. यानंतर राहुल इंडियन आयडॉल शोमध्ये सहभागी झाला. या शोच्या पहिल्या सत्रात राहुल सेकंड रनर अप होता.

राहुलने नंतर 2005 मध्ये ‘तेरा इंतजार’ हे गाणे गायले जे साजिद वाजिदनं संगीतबद्ध केलं होतं. या गाण्याला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. याशिवाय राहुलनं ‘एक लडकी अंजानी सी’ हे गाणं गायलं आणि अनेक अनप्लग्ड गाणीही गायली.

राहुलच्या चॉकलेट बॉय इमेजमुळे त्याचे नाव अनेक मुलींशी जोडलेले आहे. 2017 मध्ये राहुलचे नाव अलका याग्निकच्या मुलीशी जोडलं गेलं. त्याने मात्र या गोष्टी चुकीच्या आहेत असं सांगितलं होतं.

बिग बॉस 14 मध्ये आल्यानंतर राहुलच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली. या शोमुळे राहुलची लोकप्रियता झपाट्याने वाढली. या शोमध्ये राहुलने दिशा परमारला लग्नासाठी प्रपोज केलं आणि दिशा शोमध्ये आली आणि राहुलचा प्रस्ताव स्वीकारला.

या वर्षी जुलैमध्ये राहुलने दिशाशी लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. आता राहुल दिशासोबत आपले वैवाहिक आयुष्य एन्जॉय करत आहे.