
अभिनेता विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे (Shivani Rangole) नुकतेच लग्नबंधनात अडकले. या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

पुण्यात कुटुंबीय आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित हा लग्नसोहळा पार पडला. लग्नाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून आणि मराठी कलाविश्वातील मित्रमैत्रिणींकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

विराजस-शिवानीच्या लग्नातील साऊथ स्टाइलने सर्वांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्री किंवा अभिनेता म्हटल्यावर त्यांच्या लग्नातील लूकची चाहत्यांमध्ये विशेष उत्सुकता असते.

यावेळी शिवानी आणि विराजसने दाक्षिणात्य लूकला पसंती दिली. शिवानीने साऊथ सिल्क साडी नेसली असून त्यावर साजेसे दागिने घातले आहेत. तर विराजसने कुर्ता आणि लुंगी असा पोशाख केला होता.

याआधी अभिनेता सुयश टिळक आणि आयुषी भावे यांनीसुद्धा साखरपुड्यासाठी साऊथ इंडियन लूकला पसंती दिली होती. त्यानंतर आता विराजस आणि शिवानीच्या या लूकची सोशल मीडियावर चर्चा होतेय.

येत्या 7 मे रोजी हे दोघं कलाविश्वातील मित्रपरिवारासाठी रिसेप्शनचं आयोजन करणार असल्याचं कळतंय. हे रिसेप्शनसुद्धा पुण्यातील एका फार्महाऊसमध्ये होणार असल्याचं समजतंय.

विराजस हा अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. ‘माझा होशील ना’ या मालिकेतील त्याची भूमिका चांगलीच गाजली होती. तर शिवानीने ‘बन मस्का’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली.