
नाताळसोबत जोडून आलेला रविवार आणि विकेंडचा मुहूर्त साधत अनेक जण मुंबईबाहेर पडले आहेत. मजा करण्यासाठी मुंबई बाहेर पडलेल्यांचा मात्र ट्रॅफिकमुळे चांगला हिरमोड झाला आहे. अचानक मोठ्या संख्येनं लोकं घराबाहेर पडल्यानं मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्यात.

आडोशी बोगदा ते खंडाळा एक्झिटपर्यंतची वाहतूक संथगतीनं सुरु असल्यामुळे अनेकांचं प्लॅनिंग फिस्टकलं. पटकन पोहोचता येईल, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेचा पर्याय निवडलेल्यांचा प्रवास सुपर स्लो झाला असल्याचं यावेळी दिसून आलंय.

बस, ट्रक यासोबत छोट्या वाहनांची लांबच लांब रांग मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पाहायला मिळाली. मुंबईहून पुण्याच्या दिशेनं मोठ्या संख्येनं एकाचवेळी गाड्या निघाल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता.

बोरघाटामध्ये 20 तासांपासून वाहतूक धीम्या गतीनंच सुरु असल्याचं पाहायला मिळालंय. विकेंडला मुंबई, नवी मुंबई, ठाणे या परिसरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक हे मुंबईबाहेर फिरायला जात असतात. मात्र मोठ्या प्रमाणात स्लो मूव्हिंग ट्रॅफिकचा फटका यावेळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्यांना बसला.