
आपल्या शरीरासाठी पाणी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच ते कोणत्या भांड्यात साठवले जाते, हे देखील महत्त्वाचे असते. अनेकजण ऋतूनुसार बाटल्या बदलतात, ज्यामध्ये प्रामुख्याने तांब्याच्या आणि काचेच्या बाटल्यांचा वापर केला जातो. या दोन्ही बाटल्यांचे स्वतःचे वेगळे फायदे आणि वैशिष्ट्ये आहेत.

तांब्यामध्ये नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. जर पाणी तांब्याच्या बाटलीत किमान १६ तास साठवून ठेवले, तर त्यातील हानिकारक जीवाणू नष्ट होऊन पाणी नैसर्गिकरित्या शुद्ध होते.

तांब्याच्या बाटलीतील पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पचन सुधारते आणि सांधेदुखीमध्ये आराम मिळतो. तांब्यामुळे पाण्याच्या चवीत थोडासा बदल जाणवू शकतो. जो आरोग्यासाठी फायदेशीर असतो.

काचेच्या बाटलीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती पाण्यात कोणतेही रासायनिक घटक सोडत नाही. प्लास्टिकच्या तुलनेत काचेची बाटली अत्यंत सुरक्षित मानली जाते. काचेच्या बाटलीमुळे पाण्याची मूळ चव बदलत नाही. यात कोणत्याही प्रकारचे हानिकारक रसायने नसतात.

काचेच्या बाटल्या वापरताना त्यांच्या झाकणांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. काही वेळा निकृष्ट दर्जाच्या झाकणांचा रंग किंवा कण पाण्यात मिसळू शकतात. त्यामुळे नेहमी चांगल्या गुणवत्तेच्या झाकणाची बाटली निवडावी.

जर तुम्हाला पाणी नैसर्गिकरित्या शुद्ध करायचे असेल आणि आरोग्याला अतिरिक्त फायदे हवे असतील, तर तांब्याची बाटली उत्तम आहे. मात्र, तुम्हाला पाण्याची चव बदलायची नसेल आणि रसायनांपासून मुक्त पर्याय हवा असेल, तर काचेची बाटली हा एक सुरक्षित पर्याय ठरतो.