डॉक्टर बनून स्वतःच औषधे घेणाऱ्यांनो थांबा! शरीरात काय होतं, हे वाचल्यावर बसेल धक्का
घरातील औषधांच्या डब्यातील गोळ्या कशाप्रकारे स्लो पॉयझन ठरू शकतात, याबद्दल वैद्यकीय तज्ज्ञांनी खळबळजनक इशारा दिला आहे. याचे गंभीर दुष्परिणाम आणि आरोग्यावर होणारे घातक परिणाम एकदा जाणून घ्या

आपल्या प्रत्येकाच्या घरात औषधांच्या गोळ्यांचा बॉक्स असतोच. आपल्याकडे थोडं डोकं दुखलं की सॅरिडॉन, अंग दुखलं की कॉम्बीफ्लॅम किंवा ताप आला की क्रोसिन घेणं ही सर्वसामान्य बाब झाली. पण तुमचे हेच घरगुती उपचार तुमच्या शरीरासाठी स्लो पॉयझन म्हणजेच घातक ठरत आहेत, असा खळबळजनक इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

अनेकदा आपण मागील वेळी डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा अर्धवट राहिलेला कोर्स कपाटात जपून ठेवतो. पुन्हा तशीच लक्षणे दिसली की, जुन्याच प्रिस्क्रिप्शनवर आधारित औषधे स्वतःच्या मनाने घेतो.

तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक वेळी दिसणारी लक्षणे जरी सारखी असली, तरी आजाराचे मूळ कारण वेगळे असू शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतलेली ही औषधे तात्पुरता आराम देतात, पण आतून शरीराचे कायमचे नुकसान करतात.

वारंवार पेनकिलर्स घेतल्याने किडनी निकामी होण्याचे प्रमाण तरुणांमध्ये वाढले आहे. अनेक औषधे ही लिव्हरमध्ये मेटाबॉलाईज होतात, त्यांचा अतिवापर लिव्हरला सूज आणू शकतो.

साध्या सर्दी-खोकल्यासाठी अँटीबायोटिक्स घेण्याच्या सवयीमुळे भविष्यात गंभीर आजार झाल्यावर कोणतीही औषधे शरीरावर लागू पडत नाहीत. काही औषधांची रिॲक्शन इतकी तीव्र असते की त्यामुळे श्वास गुदमरणे किंवा रक्तदाब अचानक कमी होऊन मृत्यू ओढवू शकतो.

औषधांमुळे मूळ आजाराची लक्षणे दबली जातात, ज्यामुळे कॅन्सर किंवा हृदयविकारासारख्या मोठ्या आजारांचे निदान वेळेत होत नाही. त्यामुळे तुमची ही सवय तुम्हाला मोठ्या शस्त्रक्रियेला किंवा आजाराला निमंत्रण देऊ शकते.

औषध संपले नसेल तरी त्याची मुदत तपासा. मुदत संपलेली औषधे शरीरासाठी कायमच घातक असतात. औषधे ओलाव्याच्या ठिकाणी किंवा थेट सूर्यप्रकाशात ठेवल्यास त्यांचे गुणधर्म बदलतात. औषध घेण्यापूर्वी किमान एकदा फॅमिली डॉक्टरशी फोनवर तरी चर्चा करा.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)