
सुबोध खानोलकर दिग्दर्शित 'दशावतार' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवतोय. गेल्या सहा दिवसांत या चित्रपटाने जगभरात 9.45 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. केवळ मराठीच नव्हे तर अमराठी प्रेक्षकांनाही हा चित्रपट प्रचंड भावतोय.

'दशावतार'ने पहिल्या वीकेंडलाच 5 कोटी 22 लाख रुपयांची कमाई केली होती. दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी अशी कलाकारांची फौज या चित्रपटात आहे.

सुरुवातीला या चित्रपटाला फक्त 325 स्क्रिन्स मिळाले होते. परंतु प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून लगेच याचे शोज वाढवण्यात आले. सध्या सर्वत्र हाऊसफुल्ल बोर्ड झळकत असून प्रेक्षकांकडून ‘दशावतार’ ला प्रचंड दाद मिळत आहे.

कोकणातील पारंपरिक लोककला आणि त्याचं मर्म समजून घेत त्या माध्यमातून कोकणातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी या चित्रपटातून केला आहे.

'दशावतार'मुळे प्रेक्षक पुन्हा एकदा मराठी चित्रपटांसाठी थिएटरकडे वळत असल्याचं पहायला मिळालं. या चित्रपटातील दिलीप प्रभावळकर यांच्या भूमिकेचं विशेष कौतुक होत आहे.