
आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम तसेच त्याच्या कुटुंबियांच्या मालकीच्या रत्नागिरी जिल्ह्यातील चार मालमत्तांचा लिलाव आज पार पडणार आहे. अमली पदार्थ प्रतिबंधक तसेच तस्करी कायद्यान्वये जप्त करण्यात आलेल्या या मालमत्तांसाठी अंमलबजावणी यंत्रणांनी आज लिलाव करण्याची तारीख निश्चित केली आहे.

या मालमत्तांसाठी फक्त २० लाख रुपये इतकी आरक्षित किंमत ठेवण्यात आली आहे. या सर्व मालमत्ता रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुमके गावात आहेत.

या लिलावात समाविष्ट असलेल्या चार भूखंडांचे एकूण क्षेत्रफळ सुमारे २१,७८४ चौरस मीटर (१७१, १०,४२०, ८,९५३, आणि २,२४० चौरस मीटर) असे आहे.

हे भूखंड तस्करी आणि परकीय चलन नियमन (मालमत्ता जप्त करणे) म्हणजेच ‘साफेमा’ (SAFEMA) कायद्यानुसार जप्त करण्यात आले आहेत.

दाऊदच्या मालमत्ता खरेदी करण्यासाठी सुरुवातीला कोणीही पुढे येत नव्हते, असा अंमलबजावणी यंत्रणांचा पूर्वीचा अनुभव आहे. मात्र, २०१७ नंतर लिलावांना चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.

त्याच्या अनेक मालमत्तांचे लिलाव यशस्वी झाले आहेत. मात्र खेडमधील या विशिष्ट चार मालमत्तांना मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे या मालमत्ता विकून २० लाख रुपये मिळवण्याचा निर्धार यंत्रणांनी केला आहे.

या मालमत्तांची विक्री पूर्णत्वास नेण्यासाठी यंत्रणांनी एक नवी रणनीती अवलंबली आहे. यावेळी सीलबंद पत्राद्वारे निविदा मागविण्यात आल्या आहेत.

या पद्धतीमुळे मालमत्ता खरेदी करणाऱ्या व्यक्तीची गोपनीयता राखली जाईल, असा यंत्रणांना विश्वास आहे. या गोपनीयतेमुळे अधिक नागरिक कोणत्याही भीतीशिवाय या लिलावात सहभागी होऊ शकतील, अशी अपेक्षा आहे.