Deepika-Ranveer: दुसऱ्या बाळाच्या जन्माआधी दीपिका-रणवीर सिद्धिविनायकाच्या चरणी
Deepika-Ranveer: दुसऱ्या बाळाच्या जन्माआधी अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायकच्या मंदिरात दर्शनासाठी पोहोचले. दुआच्या जन्माच्या आधीही दोघं याच मंदिरात दर्शनासाठी गेले होते.

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह सध्या त्यांच्या दुसऱ्या बाळाच्या आगमनाची तयारी करत आहेत. या खास क्षणाआधी दोघांनी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. शुक्रवारी झालेल्या या मंदिर भेटीत रणवीरचे आई-वडीलही त्यांच्यासोबत होते.
सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी दीपिका आणि रणवीरने पारंपरिक वेशभूषेला पसंती दिली. दीपिका रंगीबेरंगी, भरतकाम केलेल्या सलवार-कमीजमध्ये दिसली, तर रणवीरने जांभळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढरा पायजमा परिधान केला होता. दोघांसोबत रणवीरचे आई-वडील जगजीत सिंह भवनानी आणि अंजू भवनानीही उपस्थित होते.
मंदिराबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली होती. गर्दीतून मार्ग काढताना दीपिका आणि रणवीर चाहत्यांना हात हलवून अभिवादन करताना दिसले. दोन वर्षांपूर्वी मुलगी दुआच्या जन्माआधीही दोघांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं होतं.
सप्टेंबर 2024 मध्ये दीपिका पहिल्यांदा आई होणार असताना दोघं मंदिरात गेले होते. त्यानंतर 8 सप्टेंबर 2024 रोजी त्यांनी मुलगी दुआच्या जन्माची गोड बातमी दिली होती. सिद्धिविनायक मंदिरात जाण्याच्या एक दिवस आधी रणवीर सिंह मुंबईतील लालबागचा राजा मंडपातही दर्शनासाठी पोहोचला होता.
दीपिका आणि रणवीर यांनी एप्रिल 2026 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून दुसऱ्या बाळाच्या आगमनाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. अलीकडेच दोघांनी आपल्या प्रेग्नन्सी फोटोशूटचे फोटोही पोस्ट केले.