
धाराशिव जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस पडला. गेल्या दोन दिवसांच्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. धाराशिवच्या भूम परंडासह कळंब परिसरातही रात्री जोरदार पाऊस झाला. पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून अनेक रस्ते बंद असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत. भूम परंडा भागात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची ते पाहणी करत आहेत. मुसळधार पावसामुळे इंटरनेट सेवाही विस्कळीत झाली आहे. दरम्यान पुराच्या पाण्यात अडकलेल्या 65 लोकांना वाचवण्यात आलं आहे.

धाराशिवमधल्या सिरसावगावातील घराघरात पुराचं पाणी शिरलं आहे. त्यामुळे अन्नधान्य, पीठ, जीवनावश्यक वस्तू वाहून गेले आहेत. चांदणी नदीला आलेल्या पुरात नागरिकही अडकले होते. त्याचसोबत पशुधनाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. विद्यार्थ्यांचं शालेय साहित्यही पाण्यात भिजल्याच्या घटना समोर येत आहेत.

धाराशिवमधल्या दुधना, चांदणी आणि बानगंगा नदी परिसरातील सोयाबीन शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. सोयाबीनसह अन्य पिकंही वाहून गेली आहेत. भूम तालुक्यातील बेदरवाडी इथली सोयाबीनची शेती पूर्णपणे नष्ट झाली आहे.

धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात मुसळधार पावसामुळे ढगपिंपरी, वडनेर भागातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी लष्काराला पाचारण करावं लागलं. पावसाने शेती-शिवारात पाणीच पाणी आहे.

धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात पिंपळगाव इथल्या गोठ्यात बांधलेल्या 20 गायी पुरामुळे दावणीला दगावल्या. भूम तालुक्यातील तीन गावांतील सहा कुटुंबांतील एकूण 14 जणांना पुराच्या पाण्यातून हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित बाहेर काढलं.